- जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 19 : शाळेच्या परिसरात तंबाखू खाणार्या शिक्षकाला नोकरीवरून निलंबित करण्यात येणार असुन शाळेच्या 200 मीटर यार्ड परिसरात जो कोणी शिक्षक गुटखा किंवा तंबाखू खाताना आढळून आल्यास त्या शिक्षकास त्वरित नोकरीवरून निलंबित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयत आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय सभेमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेत असताना जिल्हाधिकारी शिंदे यांनी हे आदेश दिले. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा 100 टक्के तंबाखू मुक्त झाल्या पाहिजेत. मात्र त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न झाले पाहिजेत अशा सुचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेताना राज्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक असून याच गतीने काम कायम ठेवून लवकरात लवकर आपले ध्येय पूर्ण करावे तसेच यासंदर्भात दर पंधरा दिवसानंतर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेण्यात यावा, असेही जिल्हाधिकार्यांनी सुचित केले. मिशन इंद्रधनुष्य या बालकांमध्ये आजारपणात होणार्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असलेल्या मिशन इंद्रधनुष्य या योजनेचा आढावा घेतेवेळी डिसेंबरपासून चार महिने राबवण्यात येणार्या या मोहिमेत जिल्हा स्तरावर व वसई विरार महानगरपालिका क्षेत्राचे पूर्ण सर्वेक्षण करून वंचित राहिलेले व गळती झालेले लाभार्थी शोधून काटेकोरपणे सदर मोहिमेची अमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू व सनियंत्रण समितीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. हत्तीरोग, हिवताप व जलजन्य रोग या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेताना हिवताप हत्तीरोग निर्मूलनासाठी नियमित प्रसिद्धीपत्रक काढून योग्य ती जनजागृती करण्यात यावी तसेच महाविद्यालयांमधून यांसारख्या विषयावर पथनाट्य, वाद विवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिल्या. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकार्यांवरील हल्ले, बोगस डॉक्टर इ. विषयांवरही या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र पाटील, डॉ. संतोष चौधरी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.सागर पाटील जिल्हा हिवताप अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी वसई विरार महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.