पालघरमधील बुलेट ट्रेनची जनसुनावणी उधळली

0
1691

वार्ताहर/बोईसर, दि. 20 : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी आम्हाला कोणतीही कल्पना न देता आयोजित करण्यात आल्याचा आरोप करुन पालघर तालुक्यातील प्रकल्प बाधितांनी काही मिनिटांतच ही सुनावणी उधळून लावली.

पालघर तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बाधितांसाठी पालघर पंचायत समिती सभागृहात आज, बुधवारी उप जिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र या सुनावणीला प्रकल्प बाधितांचा अत्य अल्प प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले. असे असताना अधिकार्‍यांनी सुनावणी सुरू करताच आम्हाला कोणतेही लेखी निवेदन न देता अंधारात ठेऊन जनसुनावणी आयोजित केल्याचा आरोप करत प्रकल्प बाधितांनी ही सुनावणी उधळून लावली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातील एकुण 288 हेक्टर खाजगी जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये पालघर तालुक्यातील 14 गावामधील टेंम्भी, खोडावे, जलसार, विराथन बुद्रुक, शिलटे, मांडे, विराथन खुर्द, रामबाग, केळवे रोड, माकुणसार, नंडोरे तर नगरपालिका क्षेत्रातील मोरगाव, वेवूर, घोळविरा अशा 14 गावांतील जमिनी संपादित होणार आहेत. या पार्श्‍वभुमीवर या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही मिनिटांमध्येच ही सुनावणी उधळून लावण्यात आली.

शासनाने शेतकर्‍यांना नको असलेले प्रकल्प त्यांच्या माथी मारू नये व गोरगरिबांना पिळून खाऊ नये. हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे यावेळी भूमीसेनेचे काळूराम धोदडे यांनी सांगितले.