वाडा पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

0
1821

7 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव

प्रतिनिधी/वाडा, दि. 20 : वाडा तालुका पंचायत समितीच्या 12 जागांसाठीचे (गण) आरक्षण वाडा तहसीलदार उध्दव कदम यांनी पी. जे. हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सोडत पध्दतीने जाहीर केले. यात अनुसूचित जमातीसाठी 7 राखीव ठेवण्यात आल्या असुन त्यातील 4 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत.

जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे :-
61 गारगांव- अनुसूचित जमाती स्त्री
62 डाहे- अनुसूचित जमाती
63 मोज- सर्वसाधारण
64 सापणे बु. – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) स्त्री
65 गालतरे- अनुसूचित जमाती
66 मांडा- अनुसूचित जमाती स्त्री
67 पालसई- अनुसूचित जमाती स्त्री
68 केळठण- सर्वसाधारण स्त्री
69 खुपरी- सर्वसाधारण
70 आबिटघर- सर्वसाधारण
71 कुडूस – अनुसूचित जमाती स्त्री,
72 चिंचघर- अनुसूचित जमाती

वाडा तहसीलदार उध्दव कदम यांनी प्रांताधिकारी अर्चना कदम व गट विकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर केले. आरक्षण व प्रभाग रचना यासंदर्भात काही हरकती असल्यास 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल कराव्यात, असे आवाहन कदम यांनी यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांना केले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश पटारे, कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, मनसेचे तालुका प्रमुख कांतीकुमार ठाकरे, पंचायत समिती सदस्य अरूण अधिकारी, नरेश काळे, पांडुरंग पटारे, संतोष बुकले, वैभव ठाकरे, भरत हजारे, भरत गायकवाड, महेंद्र ठाकरे आदी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इच्छुक उमेदवारांची आरक्षणाने केली निराशा
कुडूस गटातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांची आरक्षणाच्या सोडतीने निराशा झाली आहे. गेल्या वर्षभरापासून गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन बांधणी केलेल्या गटातील इच्छुक उमेदवारांची पुरती निराशा झाली आहे. कुडूस गटातून भाजपकडून तालुका सचिव मंगेश पाटील, विभागीय सरचिटणीस कुंदन पाटील, विद्यमान महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, विभागीय युवक सरचिटणीस दिनेश पाटील तर शिवसेनेकडून उप जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, प्रा.धनंजय पष्टे, काँग्रेसकडून मुद्दसर पटेल, इरफान सुसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहिदास पाटील हे इच्छुक होते. मात्र कुडूस गटात अनुसूचित जमाती स्त्री हे आरक्षण पडल्याने बिगरआदिवासी इच्छुकांची निराशा झाली. चिंचघर गणातुन शिवसेनेचे भावेश पष्टे, भाजपकडून पंढरीनाथ घोडविंदे, काँग्रेसकडून दिनेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैभव पष्टे तर कुडूस गणासाठी भाजपकडून अंकिता दुबेले, शिवसेनेकडून जयेंद्र दिनकर, काँग्रेसकडून डॉ. गिरीश चौधरी आदी इच्छुक होते. मात्र राखीव आरक्षण पडल्याने त्यांच्या आकांक्षेवर पाणी फिरले.

विद्यमान पंचायत समिती सदस्य अरूण अधिकारी हे मांडा गट गणातुन, नरेश काळे हे सापने बुद्रुक या गणातुन इच्छुक होते. मात्र याठिकाणी वेगळे आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. वाडा गावाची नगरपंचायत झाल्याने येथून निवडून आलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांना आता मात्र कुठल्याही गट गणात संधी नसल्याने त्यांच्याही आकांक्षा भंग पावल्या आहेत.