3 एके-47 सदृश रायफलींचा समावेश

राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 30 : मनोर हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या चिल्हार फाटा येथे शस्त्रसाठा व अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असुन या टोळीकडून तब्बल 13 कोटी 61 लाख रुपयांचा शस्त्र व अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मनोर पोलीस स्टेशन व पालघर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिल्हार फाटा येथील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या हिंदुस्थान ढाबा परिसरात 29 सप्टेंबर रोजी काही इसम शस्त्रसाठा व अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. यानंतर दराडे यांनी तत्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी स्थानिक गुन्हे शाखा व मनोर पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. यावेळी 6 वाजेच्या सुमारास काही संशयित इसम वजनदार गोणी घेऊन येथे आले. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालत त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता सदर गोणींमध्ये 3 गावठी बनावटीच्या एके-47 सदृश रायफल, 4 गावठी बनावटीचे पिस्टल व रिव्हॉल्वर, 63 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा तसेच 8 किलो 900 ग्रॅम इन्फ्रेडीन, 8 किलो 500 ग्रॅम डीएमटी, 500 ग्रॅम ब्राऊन शुगर, 3 किलो 900 ग्रॅम डोडो मा़िर्फन आदी अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. ॅॅ
दरम्यान, सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याविरुध्द मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(सी), 21,22,25, भारतीय शस्त्र अधिनियम 3, 5, 7(9), 25(क), 27 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जितेंद्र वनकोटी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.