पालघर, दि. 5 : करोना काळात कायदा व सुव्यस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या पोलीस दलातर्फे राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभुमीवरही कौतुकास्पद कामिगिरी करण्यात येत असुन पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. पालघर लायन्स क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात 202 रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन यात 59 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस दलातर्फे उद्या, 6 एप्रिल रोजी बोईसर येथे, 8 एप्रिल रोजी डहाणू येथे, तर 10 एप्रिल रोजी वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता पालघर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जव्हारमधील पतंगशहा कुटीर रुग्णालय रक्तपेढी व मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल रक्तपेढीच्या वतीने काल, 4 एप्रिल रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाबाबत पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दशरथ पाटील यांनी पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस मित्र, ग्रामरक्षक दल, सागर रक्षक दल व नागरीकांमध्ये जनजागृती करुन रक्तदानाचे महत्व पटवुन दिले होते. त्यामुळे तरुण वर्ग व महिलांनी शिबिरास चांगला प्रतिसाद देत 202 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर पोलीस स्टेशन व पालघर पोलीस मुख्यालयातील पुरुष व महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावून रक्तदान केले. सुमारे 59 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी यावेळी रक्तदान केले. पालघर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदात्यांना व पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
दरम्यान, उद्या 6 एप्रिल रोजी बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने बोईसरमधील टीमा हॉल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर 8 एप्रिल रोजी डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत डहाणूतील मसोली येथील दशाश्री माळी समाज हॉल येथे, तर जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत 10 एप्रिल रोजी वाडा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.