विरार, दि. 21 : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्या दोन तरुणांना विरार पोलिसांनी गजाआड केले असुन या भामट्यांकडून सुमारे 2 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन त्यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे असलेल्या एटीएम कार्डासोबत बदलायचे व पासवर्डही पाहून घ्यायचे. यानंतर बदलेल्या कार्डाचा वापर करुन विविध एटीएम सेंटर्समधुन पैसे काढायचे किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून विविध वस्तु खरेदी करुन ते विकायचे. अखेर पालघर सायबर सेलच्या मदतीमुळे हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असुन रोहित मृदुल कुमार पांडे (वय 28) व प्रदयुम राधेश्याम यादव (वय 21, दोघे राहणार-नालासोपारा पूर्व) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, एसी, होमथियेटर, कॅमेरा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तु व एक सोन्याची अंगठी मिळून 1 लाख 51 हजार 600 रुपये किंमतीच्या वस्तु तसेच 83 हजारांची रोख रक्कम असा 2 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.