आता डहाणू तालुक्यातील 10 वी/12 वी नापासांना मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर होणे शक्य! कोसबाड येथे YCMOU च्या अभ्यासकेंद्रास मान्यता!

0
4028

दि. 19 सप्टेंबर 2020: डहाणू तालुक्यात नूतन बाल शिक्षण संघाच्या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त (YCMOU) विद्यापीठाचे अभ्यासकेंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथून शिक्षणापासून वंचीत राहिलेल्यांचे पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ह्या अभ्यासकेंद्राचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी केले आहे. चालू वर्षी येथे 4 अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. ह्या अभ्यासक्रमाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  1. पूर्वतयारी अभ्यासक्रम
    12 वी पर्यंत शिक्षण न झालेल्या (शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या) व वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना YCMOU ची पदवी व विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी हा पात्रता अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये 100 गुणांची 3 तासांची परिक्षा होते. उत्तीर्ण उमेदवारास थेट पदवी किंवा अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. (फी रु. 750/-)
  2. बी. ए. पदवी (कला शाखा पदवीधर)
    हा 3 वर्षांचा मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम आहे. शासकीय सेवेमध्ये देखील ह्या पदवीला मान्यता आहे. 12 वी उत्तीर्ण किंवा जूनी 11 वी किंवा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रवेश मिळतो. (प्रथम वर्ष फी रु. 1600/-)
  3. मानवी हक्क प्रमाणपत्र अभ्यासक्रम
    हा 6 महिने कालावधीचा अभ्यासक्रम असून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रत्येक नागरिकासाठी उपयुक्त असा अभ्यासक्रम आहे. 10 वी उत्तीर्ण किंवा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास यासाठी प्रवेश मिळतो. (फी रु. 1800/-)
  4. बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Early Childhood Care & Education)
    हा पूर्वप्राथमिक शिक्षक/शिक्षिकांसाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे. हा 6 महिने कालावधीचा अभ्यासक्रम असून 12 वी उत्तीर्ण किंवा जूनी 11 वी किंवा एस.एस.सी. उत्तीर्ण व बालशिक्षण क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्या किंवा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रवेश मिळतो. (फी रु. 1675/-)