नागझरी: वनक्षेत्रातील लागवडीत अफरातफर केल्याचा आरोप! कष्टकरी संघटनेने केले आंदोलन!

0
2684

डहाणू दि. 20 नोव्हेंबर: नागझरी येथील सामूहिक वनक्षेत्रातीललागवडीच्या कामात 38 लाख रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप स्थानिक सामूहिक वन संसाधन व्यवस्थापन समितीने केला आहे. या वन क्षेत्रात वृक्षारोपणासाठी केवळ 16 हजार खड्डे खोदून 27 हजार 500 खड्डे खोदल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले. केवळ 6 हजार जलशोषक खड्डे खोदून कागदोपत्री 12 हजार खड्डे खोदल्याचे दर्शविले. मजूरांना वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यासाठी दिवसाची मजूरी 357 रुपये देणे आवश्यक असताना 200 रुपये मजुरी देऊन बोळवण करण्यात आली. जलशोषक खड्ड्यांसाठी प्रती खड्डा 100 रुपये मजुरी ऐवजी 50 रुपये मजुरी देण्यात आली.

याबाबत व्यवस्थापन समितीने जानेवारी 2020 मध्ये उप वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मे 2020 मध्ये कष्टकरी संघटनेतर्फे तक्रार करण्यात आली. मात्र दखल न घेतली गेल्यामुळे आज कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली डहाणू उप वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आता त्वरित चौकशी करुन दोषींवर बडतर्फीची कारवाई व्हावी व मजुरांचे फरकाचे पैसे त्वरित अदा करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कष्टकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.