डहाणू / 12 सप्टेंबर: डहाणू तालुक्यातील बावडा येथे विजय जनार्दन चुरी यांच्या वाडीमध्ये लावलेल्या सापळ्यामध्ये एक गाय व एक बैल अडकून सुटका न झाल्याने जागीच गतप्राण झालेले आहेत. काल पहाटे हा प्रकार उघडकीस आला असून तेव्हापासून गाईचे वासरु भूकतहान विसरुन तेथेच बसून आहे. चुरी यांच्या वाडीत कुंपणाऐवजी ठिकठिकाणी तारांचे सापळे लावलेले असून एका सापळ्यातून जनावर निसटले तरी पुढील सापळ्यात ते अडकेल अशी व्यवस्था केलेली आढळते आहे. वीजप्रवाहीत तारा देखील पसरलेल्या दिसून येत आहेत. सापळ्यात अडकल्यानंतर जनावरांचे काय केले जाते हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर धोका पत्करुन सापळ्याच्या तारा कापून गुरांची सुटका केली जाते. परंतु ही गुरे कमनशिबी ठरली आहेत.

चारच दिवसांपूर्वी पालघरचे जिल्हा पशूधन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ” प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध नियम 1965 ” चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले होते. हे निवेदन भारवाहतूक करणाऱ्या बैल व घोडे असे प्राणी केंद्रस्थानी ठेवून केले असले मोकाट गुरांच्या नशिबी मात्र ह्या कायद्याने किंवा गोवंश हत्याबंदी कायद्याने संरक्षण होताना दिसत नाही. बावडा येथील घटनेत दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

ह्या घटनेसंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे यांच्याशी संपर्क साधला असता, घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस पोहोचणार असून मृत्यूमुखी पडलेल्या गुरांचे शवविच्छेदन करुन मृत्यूची कारणीमीमांसा केली जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान गाईजवळचे सापळे काढून टाकण्यात आरोपीला यश आले असले तरी मृत बैलाजवळील एकापाठोपाठ एका सापळ्याचे अस्तित्व शाबूत आहे. कुंपणावर देखील ठिकठिकाणी सापळे दिसून येत आहेत.
