वाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका

0
2979

अनेक घरांचे, पोल्ट्री फार्मचे छप्पर उडाले!

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वायु वादळाने कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना त्याचा फटका तालुक्यातील टकली, खरीवाली, जामघर, अबिटघर आदी गावांनासुद्धा बसला असून अनेक घरांची कौले, पत्रे तसेच शेतकर्‍यांच्या पोल्ट्री फॉर्मचे पत्रे उडून व विजेचे पोल आणि झाडे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वायु वादळाने कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात झोडपुन काढले. या वादळाचा फटका वाडा तालुक्यातील अनेक गावांना बसला असून वार्‍याच्या वेगाने घरावरील पत्रे, कौले उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकर्‍यांच्या पोल्ट्रीवरील पत्रे उडल्याने अनेक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच अनेक ठिकाणी मोठी झाडे व विद्युत खांबही पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

टकली गावातील किशोर सीताराम पाटील, सुवर्णा कमलाकर पाटील, रघुनाथ सदाशिव पाटील, अनिल झिपरु भांगरे, शुभाष रामु सवर, अंकुश शिवराम पाटील, संतोष बुधाजी टबले, रमेश शंकर टबले, विलास किसन वाघ, काशीनाथ नवशा वाघ तर खरिवली गावातील चेतन पंढरीनाथ अधिकारी, वासुदेव पुंडलिक आकरे, भगवान दामोदर अधिकारी व काही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जामघर येथील प्रवीण गोळे यांच्या पोल्ट्री फॉर्मचे तर किरण गोळे आणि शाम गोळे यांच्या घरांचे छप्पर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, या वादळामुळे झालेल्या घरांच्या आणि शेतकर्‍यांच्या पोल्ट्रीच्या नुकसानीची भरपाई शासनाने तत्काळ द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

अचानक आलेल्या मोठ्या वादळाने आमच्या टकली गावातील अनेक घरांची कौले, पत्रे उडून गेले आहेत. माझ्याही पोल्ट्रीफॉर्म वरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई आम्हाला मिळावी.
-प्रकाश पाटील, शेतकरी-टकली