राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणू दि. ३: महिलांनी भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी निर्माण झालेले कायदे समजून घेतल्याशिवाय महिलांचे शोषण थांबणार नाही. महिला आयोग, कायदेविषयक सल्ला व सहाय्याच्या तरतुदी या व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहेच. देशातील ५० टक्के संख्याबळ असलेल्या समस्त महिलावर्गाच्या स्वतःच्याच मनात समानतेचे विचार रुजल्याशिवाय प्रत्यक्षात लिंगभेद नष्ट होऊन समानता प्रस्थापित होणार नाही असे विचार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते ठाणे जिल्हा स्त्री शक्ती संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ” भारतीय संविधान व स्त्रियांचे संविधानिक अधिकार ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
संजीव जोशी यांनी भारतीय संविधान या विषयावर जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला असून ह्या उपक्रमांतर्गत आज २७ वे व्याख्यान पार पडले. कै. पद्मश्री अनुताई वाघ यांनी स्थापन केलेल्या ठाणे जिल्हा स्त्री शक्ती संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपिठावर संस्थेच्या सचिव सौ. मधुमती राऊत व कर्णबधिर विद्यालयाच्या मुख्याद्यापिका सौ. शोभा चव्हाण उपस्थित होते. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचे प्रकरण ३, मार्गदर्शक तत्वांचे प्रकरण ४ आणि मूलभूत कर्तव्यांचे प्रकरण ४ क यातील अनुक्रमांक १२ ते ५१ आणि ५१ क मधील ११ मूलभूत कर्तव्ये समजून घेतल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने सक्षम नागरिक बनणार नाही. जोपर्यंत आपण सक्षम नागरिक बनत नाही तोपर्यंत आपण समर्थ भारत घडवू शकत नसल्याचे विचार व्यक्त करुन सर्वांनी भारतीय संविधान समजून घ्यावे असे आवाहन संजीव जोशी यांनी उपस्थितांना केले.