राजतंत्र न्यु नेटवर्क
डहाणू, डी. ०७ : दानू चारोटी रस्त्यावर कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय महिलेचा मृत्य झाला आहे. सुमन धर्मा महाळुंगे असे सदर महिलेचे नाव असून याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन महाळुंगे या ५ मे रोजी आपल्या नातवासह दुचाकीवरून रानशेत येथील आश्रमशाळेत त्यांच्या मुलाच्या ऍडमिशन बाबत चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील काम आटपून पुन्हा डोंगरीपाडा येथे परतत असताना डहाणू- चारोटी रस्त्यावरील कांडोळपाडा गावचे हद्दीत त्यांना त्यांचे नातेवाईक दिसल्याने यांनी नातवाला गाडी वळवायला सांगितली. गाडी वळवत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या एम. एच. ४८ / ए. सी. ६१४० या क्रमांकाच्या होंडा सिटी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सुमन महाळुंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा नातू यात गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान कारचालकावर डहाणू पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.