राजतंत्र/प्रतिनिधी
पालघर : दापचरी सीमा तपासणी नाका ते चारोटी टोल नाका परिसरामध्ये महामार्ग पोलिसांकडून सर्रास हप्ते खोरी सुरू असल्याचा आरोप होत आहे. खाजगी प्रवासी वाहनांकडून प्रत्येकी दरमहा दोनशे ते पाचशे रुपये हप्ता महामार्ग पोलीस घेत असल्याचे दोन वाहन चालकांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातून गुजरात राजस्थान व इतर जिल्ह्यांमध्ये या तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या प्रवासी वाहनांकडून बेकायदा टोकन देऊन दरमहा पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
दररोज रात्रीच्या वेळेस सामान्य तपासणीच्या नावाखाली ही लूट सुरू असल्याचे समाज माध्यमांवर फिरणाऱ्या चित्रफितीतून दिसून येत आहे. या महामार्गावरून दररोज हजारो खाजगी प्रवासी वाहने धावत असतात. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व पुढील राज्यांमध्ये दररोज हजारो प्रवासी यातून प्रवास करत असतात. याचबरोबरीने चारोटी घोडबंदर व स्थानिक स्तरावरही प्रवासी वाहने ये-जा करीत असतात. या प्रवासी वाहनांना तपासणीच्या निमित्ताने थांबवून त्यांच्याकडून दरमहा हप्तेखोरी केली जाते. हप्ते घेतल्यानंतर त्यांना छापील चिठ्ठी सदृश्य टोकन दिले जाते. दर महिन्यासाठी महिना व वर्ष नमूद केलेले टोकण हप्ते घेतल्यानंतर दिले जाते. असे प्रत्येक प्रवासी वाहनासाठी करण्यात येते.
दापचरी सीमा तपासणी नाक्यावर वळण परिसरात महामार्ग पोलिसांचा ताफा रात्रीच्या वेळेस गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे घेण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच चारोटी टोल नाका येथेही हाच प्रकार सुरू असतो. महामार्ग सुरक्षा, अपघात बचावकार्य, मदतकार्य, वाहतूक सुरळीत ठेवणे, महामार्गाच्या नियमावली, लेनची शिस्त, वेगमर्यादा अशा नियमांसाठी महामार्ग पोलीस काम करत असले तरी या नियमांच्या नावाखाली प्रवासी वाहनांकडून लूट केली जात आहे. त्यामुळे सध्या या लुटीचा प्रकार जोरदार चर्चेत आहे.
या कुपन व टोकन प्रकारांमध्ये नक्की कोण सामील आहे. हे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी शोधून काढणे आवश्यक बनले आहे. दररोज शेकडो प्रवासी वाहन चालकांकडून नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून आत्तापर्यंत लाखो रुपये जमा केल्याचे समजते. गेल्या अनेक काळापासून हा प्रकार सुरू असला तरी आता तो उजेडात आला आहे. महामार्ग पोलिस या प्रकारामुळे टीकेचे धनी ठरू लागले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस खात्याचे नाव बदनाम होत असल्यामुळे या प्रकारात सामील असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यानिमित्ताने समोर आली आहे. या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे महामार्ग पोलीसच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी सांगितले.
हा प्रकार गंभीर आहे. अशा प्रकारामुळे पोलीस खात्यासह शासनाची बदनामी होत आहे. वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देऊन हा प्रकार थांबवण्यासाठी पावले टाकली पाहिजेत.
-काशिनाथ चौधरी, जि.प.सदस्य, जि.प.पालघर
महामार्ग पोलीस त्यांच्या मूळ कर्तव्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारातून चिरीमिरी गोळा करत आहेत. यामुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये मोठा रोष आहे. हा प्रकार तातडीने बंद झाला पाहिजे अशी मागणी राहील.
-हरबंस नन्नाडे, प्रवक्ता, अखिल भारतीय वाहन चालक-मालक महासंघ