सापणे येथे लागलेल्या वनव्यात वनविभागाने लावलेली झाडे जळाली

0
1423
  • मानवनिर्मित वनव्यांमुळे वनसंपत्ती होतेय नष्ट
  • वनविभागाकडून ठोस पाऊले उचलण्याची गरज

राजतंत्र : वार्ताहर
वाडा : तालुक्यातील सापणे बु गावाच्या हद्दीमधील खाजगी जंगलाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात झाडे जळाली असून यामध्ये वनविभागाकडून लावलेली झाडे देखील जाळून खाक झाली आहेत.

जिल्ह्याच्या अनेक भागात फेब्रुवारी महिन्यापासून ते पाऊस पडेपर्यंत जंगलांना वणवे लावले जात असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येत आहे.या लावल्या जाणाऱ्या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यप्राण्यांना देखील याचा फटका बसून त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मागील काही वर्षांपासून जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी भाताची रोपे बनविण्यासाठी जंगलातील गवत ओढून त्याची राबनी केली जात होती. मात्र आत्ता राबणीचा प्रकार कमी होत चालल्याने आणि पाळीव जनावरे नसल्याने जंगलात गवत मोठ्या प्रमाणात राहते.त्यातच ससे, रानडुक्कर,हरीण यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलांना आगी लावतात. मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आणि हे गवत पडत असलेल्या उन्हात तापलेले असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात लागते आणि आटोक्यात आणण्याच्या बाहेर जाऊन हा वणवा पसरून पूर्ण डोंगर जाळून खाक होतात.

आठ ते दहा वर्षांपूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गाई, म्हशी, रेडे शेतकऱ्यांकडे असायचे. मात्र आत्ता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पूर्वी एका एका घरी 15 ते 20 जनावरे असायची आणि गावामध्ये याची संख्या 300 ते 400 असायची. मात्र आत्ता एखाद दुसऱ्या घरी ही जनावरे आढळून येतात. गावाचा विचार केला तर 20 ते 25 पाळीव जनावरे गावामध्ये आढळून येतात. पूर्वी ही सगळी जनावरे शेतकरी जंगलात चरायला नेत असे त्यामुले जंगलात गवताचे प्रमाण कमी राहत होते. तसेच उन्हाळ्यात देखील गुरांना चारण्यासाठी गवत लागत असल्याने सहजा कोणी जंगलात आगी लावत नसे.मात्र सध्या गुरेढोरे राहली नसल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यातच काही शिकार करणारी समाजकंटक मंडळी या जंगलाला आग लावतात त्यामुळे पूर्ण जंगल जाळून राख होते. त्यामुळे काही प्रमाणात राहिलेल्या मुक्या जनावरांना देखील खाण्यासाठी गवत उरत नसल्याने चाऱ्याच्या शोधात त्यांना रानोमाळ भटकावे लागते.

या लावल्या जात असलेल्या वनव्यांमध्ये नवीन उगवलेली जंगली झाडांची रोपे जाळून खाक होतात. तसेच जंगलातील अनेक पशु-पक्षी देखील जळून जातात. पक्षांची घरटी देखील जळून जातात. तसेच शासनाच्या करोडोच्या घरात असलेल्या वृक्षारोपनाला देखील गालबोट लागले जात असून वृक्षारोपनावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या वनविभागाने या वनव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

वनविभागाने वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जंगलात लागणाऱ्या वनव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री घेतल्यास जंगलात वृक्षारोपण करण्याची गरज भासणार नाही.जंगलात पावसाळ्यात उगविणारी जंगली झाडांच्या बियांची रोपे नैसर्गिक रित्या झटपट वाढतात आणि त्यांना उन्हाळ्यात पाणी देण्याची गरज देखील भासत नाही. आणि देशी झाडांचा वाण वाचण्यास मदत देखील होईल.

  • ग्रामपंचायतींवर जबाबदारी वाढविण्याची गरज
    ग्रामपंचायतस्तरावर लावल्या जाणाऱ्या आगीनबाबत जनजागृती करण्याची नितांत गरज असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जंगलबचाव समिती स्थापन करून ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात आग लागली जाईल ती विझविण्याची जबाबदारी देखील त्यांना देऊन जो आग लावली त्याचा तपास लावून त्याची माहिती पोलीस ठाण्यात आणि वनविभागाला देण्याची जबाबदारी अशा समितीला दिल्यास शिकारीसाठी हे आग लावण्याचे प्रकार कमी होऊ शकतात.

सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवे लागल्याचे दिसून येत आहेत. खर तर वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आज. वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जर या वनव्यांवर नियंत्रण आणणाऱ्या अत्याधुनिक सामुग्री घेतल्यास जंगल मोठ्या प्रमाणात वाचेल. त्याच बरोबर आगी लावणाऱ्या समाजकंटकांवर वनविभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
-स्वप्नील ठाकरे, निसर्ग प्रेमी