राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 26 : पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज, मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्रीनिवास वनगाही उपस्थित होते. गावित यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपने चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारत काँग्रेसमधुन आयात केलेल्या गावित यांना उमेदवारी दिली होती. तर श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी भाजप व शिवसेनेने ही पोटनिवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती व यात राजेंद्र गावित निवडून आले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर जागावाटपात पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने शिवसेना पुन्हा श्रीनिवास वनगांना उमेदवारी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र बहूजन विकास आघाडीला काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभुमीवर एक सक्षम उमेदवार म्हणून शिवसेनेने खासदार गावित यांना पक्षात आयात करत त्यांना पालघर लोकसेभेची उमेदवारी जाहिर केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, खासदारकीची प्रत्येक जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यातच श्रीनिवासने विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने गावित यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. जागा वाटपात जागाही मिळाली आणि उमेदवारही मिळाला, असे पहिल्यांदाच घडले असेल, असेही ठाकरे म्हणाले. तर श्रीनिवासला संसदेत पाठवण्याचा माझा शब्द कायम आहे. श्रीनिवासला आमदार व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थिती विधानसभेत पाठवण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे 4 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतले!

खासदार राजेंद्र गावित यांच्या शिवसेना प्रवेश कार्यक्रमातूनच पालघर नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले व निवडून आलेले शिवसेनेचे 4 बंडखोर नगरसेवक आज स्वगृही परतले. प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक दिनेश पांडुरंग बाबर, प्रभाग क्रमांक 2 ब चे नगरसेवक शेरबानू मुनाफ मेमन, प्रभाग क्रमांक 4 अ च्या नगरसेविका कविता सुरेश जाधव व प्रभाग क्रमांक 4 ब चे नगरसेवक प्रवीण मधुकर मोरे या बंडखोर नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाने आता पालघर नगरपरिषेद युतीच्या नगरसेवकांची संख्या 25 झाली आहे.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा