वसई, दि. 3 : तालुक्यातील नालासोपारा भागात परदेशी नागरीकांकडून होणारे अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे गुन्हे काही प्रमाणात कमी झालेले दिसत असतानाच तुळींज पोलिसांनी मोठी कारवाई करत दिड कोटींच्या कोकेनसह 4 नायजेरियन नागरीकांना अटक केली आहे. काल, सोमवारी तुळींज पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपार्यातील प्रगतीनगर भागात काही नायजेरियन नागरिक कोकेनची विक्री करणार असल्याची माहिती तुळींज पोलिस ठाण्याच्या तपासणी शाखेला मिळाली होती. यानंतर पोलीस निरिक्षक डी. एस. पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सोलंकर, एस. डी. अवघडे, अर्चना दुसाणे, पोलिस उपनिरीक्षक थोरात, फौजदार बाळासाहेब बंडल, शिवानंद सुतनासे, अनिल शिंदे, आनंद मोरे, शेखर पवार, प्रशांत सावडेकर, मुनाफ तडवी, जगदीश बेलदार, सुखराम गडखा व योगेश नागरे यांच्या पथकाने सापळा रचून चार नायजेरियन नागरीकांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 747 ग्राम वजनी 1 कोटी 49 लाख 58 हजार रुपये किंमतीचे कोकेन आढळून आले.
इझीकेल ओसिता (वय 28), ओबुन्ना चिकुनया (29), ऑरजी फिलिप (30) आणि अँजाह चिकूएमेंका (30) अशी सदर आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर तुळींज पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु आहे.