पालघर पोलीसांचे ऑल आउट ऑपरेशन, फरार आरोपीला ४ वर्षांनंतर अटक

0
1736

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर, दि. २१ : पालघर जिल्हा पोलीसांकडून मागील काही दिवसांपासुन जिल्ह्यातील ऑल आऊट ऑपरेशन सुरु असुन विविध गुन्ह्यातील आरोपींसह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरु आहे. काळ, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला ४ वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. अब्दुल रहेमान सईद अहमद अन्सारी (वय ३४) असे सदर आरोपीचे नाव आहे.
पेशाने बांधकाम व्यवसायिक असलेल्या अब्दुल अन्सारीने ८ मार्च २०१४ रोजी आपल्या साथीदाराच्या मदतीने विरार पूर्वेतील दुर्गा हॉटेलच्या समोर एका इसमावर प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी सदर इसमाच्या कारची तलवारी, हॉकी स्टिक व लोखण्डी रॉडने तोडफोड करण्यात आली होती, या हल्यांनंतर अब्दुल अन्सारी फरार झाला होता. त्याच्यावर विरार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संविधान संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२४, ३४१, ३०७ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मागील ४ वर्षांपासून पोलिसांच्या हाती तुरी देत होता. काळ २० ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटचे अधिकारी – कर्मचारी वसई विरार भागात ऑल आऊट ऑपरेशन राबवित असताना गोपचार पाडा भागात अब्दुल अन्सारीला अटक करण्यात आली, दरम्यान अन्सारीला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे,
दरम्यान, नुकतेच पालघर जिल्हा पोलीसांना मुंबई अहमदाबाद मार्गावर ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीसह जबरी चोरी घरफोडी व वाहन चोरी प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ११ गुन्हे दाखल असलेल्या १५ आरोपीना अटक करण्यात यश आले आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेला लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. स्किमरद्वारे क्लोन तयार करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वेटरांच्या टोळीला दोन दिवसांपूर्वीच गजाआड करण्यात विरार पोलिसांना यश आले असून हे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य आरोपीस बिहार राज्यातील गया येथून ताब्यात घेण्यात आले आहे.