पालघर, दि. 10 मार्च: राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महसूल विभाग आदिवासींचे जीवन, आर्थिक परिस्थिती व उपजीविकेचे साधन ह्याचा विचार न करता परस्पर जमीन विक्रीची परवानगी देत असल्याचा आरोप शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. भूमाफिया, दलाल, बिल्डर, महसूल यंत्रणेला हाताशी धरुन आदिवासींच्या संरक्षित कुळांची नावे 7/12 उताऱ्यातील नोंदीवरुन काढून टाकली जात असल्याचे व आदिवासींच्या हजारो जमिनी बिगर आदिवासींच्या घशात गेल्याचे गावीत यांचे म्हणणे आहे.
दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची सीआयडी मार्फत चौकशी करावी आणि त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सार्वजनिक करावी अशी मागणी देखील गावीत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी विक्रमगड मधील भ्रष्ट्राचाराच्या विरोधात लढणाऱ्या प्रहार ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला असून अशा प्रवृत्तीचा मी निषेध करतो व 3 पक्षांची आघाडी असली तरी सांबरेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका गावीत यांनी मांडली. अलिकडेच निलेश सांबरे यांचे जिल्हा परिषद सदस्यपद रद्द झाल्यामुळे त्यांच्या विरोधकांनी समाज माध्यमातून दिलेल्या आक्षेपार्ह प्रतिक्रियांतून वाद झाला होता. ह्या वादात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाली असून पायाला गंभीर इजा झाली आहे. गावीत यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना आपली कैफियत मांडण्यासाठी पत्रकार परिषदेत हजर केले होते.

आघाडी सरकार मधील घटक पक्षाचे खासदार असताना शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांनी थेट महसूल मंत्र्यांना टार्गेट केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.