डहाणू नगरपरिषदेतील 12 प्रभागांपैकी 5 प्रभागांच्या निवडणूक प्रक्रीयेला पालघर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची या प्रभागातील प्रक्रीया थांबली आहे. उर्वरीत प्रभागांतील उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करायची किंवा नाही याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घ्यायचा आहे. निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती मिळालेल्या प्रभागांमध्ये क्र. 1, 2, 9, 10 व 12 या प्रभागांचा समावेश आहे. 12 पैकी 5 प्रभांगातील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती मिळाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 13 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. 24 तारखेपर्यंत 133 उमेदवारांनी नगरसेवकपदांसाठी तर 9 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्रे भरली. मात्र ऐनवेळी अर्ज भरण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे निवडणूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. यामुळे उमेदवारी अर्ज न तपासताच स्विकारण्यात आले. यातून अनेक नामनिर्देशन पत्रांमध्ये त्रुटी राहील्या. पर्यायाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी प्राप्त झालेल्या एकूण 142 नामनिर्देशन अर्जांमधून 31 अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले. या बाद अर्जांमध्ये विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी) व सईद शेख (काँग्रेस) यांचादेखील समावेश होता.
इतक्या मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्रे बाद ठरल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर अक्षम व मनमानी अधिकारी असल्याचे आरोप होऊ लागले. लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. या बाद झालेल्या उमेदवारांपैकी प्रभाग क्र. 1 ब मधून उमेदवारी अर्ज भरणारे यशवंत नारायण कडू (भाजप), प्रभाग 2 ब चे सईद रशीद शेख (काँग्रेस), प्रभाग 9 अ च्या दिपा किसन कणबी (शिवसेना), प्रभाग 10 ब चे राजेंद्र लखू माच्छी (राष्ट्रवादी) व ज्ञानेश्वर चौधरी (काँग्रेस), प्रभाग 12 ब च्या राणी महेश पवार (राष्ट्रवादी) या उमेदवारांनी पालघर जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले. या अपिलावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. तथापी निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांचेतर्फे म्हणणे मांडण्यात आले नाही. आता 2 डिसेंबर रोजी या अपिलांवर युक्तीवाद होणार असून 4 डिसेंबर रोजी निकाल दिला जाणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने संबंधीत 5 प्रभागांतील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती दिली आहे. यांना 3 अपत्य असल्याच्या कारणाने अपात्र करावे यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केले. तथापी जिल्हाधिकारी यांच्या निकालावर राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली असताना व आजही ही स्थगिती कायम असताना राज्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशाला केराची टोपली दाखवत आंचल गोयल यांनी 3 अपत्याचे कारण दाखवत सईद यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरवला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मनमानीचा एक सुरस किस्सा:
या निवडणूकीत सईद शेख यांनी प्रभाग क्रमांक 2 ब मधून उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या पत्नी सबेरा यांनी देखील प्रभाग क्रमांक 6 ब मधून उमेदवारी अर्ज भरला. सईद शेख यांचा उमेदवारी अर्ज 3 अपत्याचे कारण दाखवून फेटाळण्यात आला असला तरी त्यांच्या पत्नी सबेरा यांचा अर्ज मात्र स्विकारण्यात आला. पती पत्नी यांना वेगवेगळा न्याय दिल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.