‘त्या’ हत्याप्रकरणातील दोन्ही पोलीस कर्मचारी अखेर निलंबित!

पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची कारवाई!

0
3155

पालघर, दि. 12 : अनैतिक संबंधातून प्रियकरासोबत मिळून पतीलाच जिवे ठार करणार्‍या महिला पोलिसासह तिच्या पोलीस प्रियकराला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विकास वसंत पष्टे (पोशि./689) व स्नेहल सुधाकर पाटील (मपोशि./513) अशी सदर आरोपी पोलिसांची नावे आहेत. स्नेहल व विकासने अन्य तिघांना सुपारी देऊन स्नेहलचा पती पुंडलीक पाटील यांची हत्या घडवून आणली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, विकास पष्टे हा वसई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचा ओंडर्ली (रायटर) म्हणून कर्तव्यावर होता. तर स्नेहल पाटील ही लेखनीक अंमलदार यांना मदतनीस म्हणून कार्यरत होती. या दोघांचे प्रमसंबंध असल्याचा संशय स्नेहलचे पती पुंडलीक पाटील यांना आल्यानंतर ते वारंवार स्नेहलकडे याबाबत विचारणा करत होते. पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने स्नेहलने विकाससोबत कट रचून तीन जणांना त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार, 18 फेबु्रवारी रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर-ढेकाळे गावाच्या हद्दीत पुंडलीक यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचे गांभिर्य पाहता पोलिसांनी कसून तपास करत प्रथम विकास पष्टेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने संपुर्ण प्रकार पोलिसांना सांगितला . यानंतर 3 मार्च रोजी स्नेहल व या गुन्ह्यात सहभागी इतर तिघांना अटक करण्यात आली होती. सर्व अटक आरोपी अद्यापही पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील दोन्ही पोलीस कर्मचारी शिस्तप्रिय पोलीस दलामध्ये जबाबदार पदावर कार्यरत असताना, तसेच त्यांना कायद्याचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्यांनी असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमाणसातील प्रतिमा मलीन झाली असून त्यांचे वर्तन शिस्तप्रिय पोलीस दलात अशोभनीय आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.