शेकडो आरोपींविरोधात गुन्हे

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 31 : गेल्या वर्षभरात पालघर जिल्हा पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन सुमारे 51 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शेकडो आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यात रेतीचोरी, गुटखा, दारुबंदी, जुगार व मटका, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, बांगलादेशी नागरीकांवर कारवाई तसेच अवैधरित्या हत्यारे बाळगल्यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

वाढते अवैध धंदे व गुन्हेगारीवर वचक बसावा म्हणून जानेवारी 2019 ते 29 डिसेंबर 2019 या कालावधीत पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या. यात अवैधरित्या रेती वाहतुक व उत्खननाबाबतच्या 112 गुन्ह्यांत 263 आरोपींवर कारवाई व सुमारे 14 कोटी 61 लाख 55 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुटख्याची विक्री व वाहतुक करण्यासंदर्भातील एकुण 121 गुन्ह्यात 182 आरोपींवर कारवाई व 12 कोटी 88 लाख 32 हजार 453 रुपयांचा मुद्देेमाल जप्त, अवैधरित्या दारु विक्री व वाहतुक करण्याबाबतच्या 673 गुन्ह्यातील 689 आरोपींवर कारवाई व 2 कोटी 49 लाख 71 हजार 49 रुपयांचा मुद्देमाल जप्त, मटका व जुगाराशी संबंधित 77 गुन्ह्यातील 436 आरोपींवर कारवाई व 58 लाख 25 हजार 382 रुपयांचा मुद्देमाल जप्त, अंमली पदार्थांबाबच्या 85 गुन्ह्यातून 118 आरोपींवर कारवाई व 19 कोटी 68 लाख 23 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त, विनापरवाना घातक शस्त्रे बाळगल्याच्या 13 गुन्ह्यांमधील 29 आरोपींवर कारवाई व 62 लाख 63 हजार 385 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आदींसह वेश्याव्यवसायाच्या 18 गुन्ह्यातील 36 आरापींवर कारवाई व 1 लाख 17 हजार 740 रुपयांचा मुदद्देमाल जप्त तसेच विनापरवाना भारतात वास्तव्य करणार्या 12 बांगलादेशी नागरीकांवरील कारवाईचा यात समावेश आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वसईचे अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी या कारवाया केल्या आहेत.