बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो…! – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार

0
1939

प्रतिनिधीmahanews_EPAPER_160418_1_120443
वाडा, दि. १५ : बाबासाहेबांचे दीन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला  राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी  येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.
         भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी ( दि . १४ ) येथील सिद्धार्थ नगर येथे सिध्दार्थ युवक मंडळाच्या वतीने जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री सवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत घडविण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकार कटिबद्ध असून दीन-दलितांसाठी असणाऱ्या विकासाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
        यावेळीं वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर, उपनगराध्यक्ष ऊर्मिला पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप पवार , नगरपंचायत भाजपा गटनेते मनीष देहरकर, नगरपंचायत स्वछता समिती सभापती रामचंद्र  जाधव, नगरसेविका वर्षा गोळे,विशाखा पाटील, रिमा गंधे, अंजनी पाटील, राम भोईर,  शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पटारे, शेकापचे तालुका चिटणीस सचिन मुकणे, चर्मोद्योग सेनेचे भरत गायकवाड,  सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरात यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर सायंकाळी संपूर्ण वाडा शहरातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बाबासाहेबांचे विचार सर्वव्यापी – विजय गायकवाड
            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचे नेते नव्हते, त्यांनी एकाचवेळी विविध पातळ्यांवर काम करून समाजातील सर्वच घटकांसाठी योगदान दिले आहे. मात्र आज त्यांना एका जातीत अडकवण्याचा प्रयत्न मोठ्याप्रमाणात होत आहे. बाबासाहेबांनी या देशातील दलित समाजाबरोबरच स्रिया, कामगार व वंचित समाजासाठी काम केलं.संविधानाच्या माध्यमातून येथील प्रत्येक माणसाला न्याय दिला.  या देशाची अर्थनीती, जलनीती ठरविण्यात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. त्यातून रिझर्व्ह बॅंकेसारखी संस्था उभी राहिली. हिंदू कोडबिलाद्वारे समस्त स्रीवर्गाला हक्क दिले. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य सर्वव्यापी आहे. परंतु त्यांना बंदिस्त करण्याच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना हाणून पाडण्याची गरज आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
           सिध्दार्थ नगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड बोलत होते. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी आजची  तरुणपीढी वाचन संस्कृतीपासून दुरावली आहे. बाबासाहेबांचे विचार वाचण्याऐवजी त्यांना प्रतिमांमध्ये बंदिस्त करण्यावर अधिक भर दिला जातोय असे म्हणत तरुणांना खूप वाचायला हवे. असे म्हणत मुलींना चांगले शिकवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्याचप्रमाणे फुले- आंबेडकरी विचार अन्य समाजापर्यंत पोहचवायला हवा असेही ते म्हणाले.
भाजपा कार्यालयात अभिवादन
          भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा,  कोकण विभाग संघटनमंत्री सतिश धोंड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.