विशेष प्रतिनिधी
वाडा, दि. १५ : येथील नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली ‘गोवा’ वारीचा घाट घातला जात आहे. नगर पंचायतीकडे पैसा नसल्याने कोणतीही विकासकामे होत नाहीत. मात्र प्रशिक्षणावर लाखो रुपये उधळले जाणार असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाडा नगर पंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगर पंचायत असून डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष व नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्यापूर्वी ग्रामपंचायत असल्याने उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने ग्रामपंचायतीची आर्थिकस्थिती वाईट होती. त्यामुळे प्रशासकीय खर्च भागवण्या पलीकडे ग्रामपंचायत विकासकामांवर खर्च करू शकली नाही. त्यावेळी पाणीयोजनेचे येणारे वीजबिल भरणेही ग्रामपंचायतला शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रसंग ओढवत असे. आज नगर पंचायत झाल्यानंतरही या स्थितीत फार बदल झालेला नाही. नगर पंचायतीला काही महिन्यांपूर्वी मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे व अन्य अनुदानापोटी सुमारे आठ लाख रुपयांचा मिळालेला निधी थकित वीजबिल भरण्यासाठी वापरल्याने नगर पंचायत विजबिल भरू शकली. अन्यथा वीजपुरवठा कपातीचा प्रसंग नगर पंचायतवरही ओढवला असता. नगर पंचायत आजही आर्थिक संकटात असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.