दिनांक 5 नोव्हेंबर: डहाणूतील ऋषी मालविया या तरुणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची कार्टून असलेला व त्यावर अपशब्द वापरलेला फोटो शेअर केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली आहे. ऋषीला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

ऋषीच्या फेसबुक वॉलवरुन वादग्रस्त पोस्ट शेअर झाल्यानंतर आज (5 नोव्हेंबर) सकाळी, शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा, जिल्हा उपप्रमुख संतोष शेट्टी व शहर प्रमुख संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. ऋषी मालवीया हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असून तो आज सायंकाळी स्वतःहून पोलीसांकडे हजर झाला.
दरम्यान आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून कोणीतरी आपल्याला बदनाम करण्यासाठी हा खोडसाळपणा केल्याचा दावा ऋषीने राजतंत्रशी बोलताना केला आहे. याबाबत पोलीसांकडे तक्रार करणार असल्याचा इरादादेखील ऋषी यांने व्यक्त केला होता.
