हजारो रुपये किंमतीचे नकली सोने हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 7 : वसई तालुक्यातील विविध भागातील ज्वेलर्सच्या मालकांना नकली सोने असली असल्याचे भासवून हजारोंचा गंडा घालणार्या टोळीला अर्नाळा पोलिसांनी जेरबंद केले आहे. विरार पश्चिमेतील वैशाली ज्वेलर्सच्या मालकाची अशाप्रकारे फसवणूक झाल्यानंतर याबाबत अर्नाळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत तीन जणांच्या या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या. तर अन्य एकजण फरार आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2019 रोजी तीन इसम वैशाली ज्वेलर्समध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी आपल्याकडील नकली सोने असली असल्याचे भासवून ते ज्वेलर्स मालकाला दिले व त्याबदल्यात 2 हजार रुपये घेतले. यानंतर तिघेही तेथून निघून गेल्यानंतर काही वेळाने ज्वेलर्सच्या मालकाने ते सोने तपासले असता ते नकली असल्याचे समोर आले. यानंतर त्याने तत्काळ अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. अर्नाळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास करत दुसर्याच दिवशी राकेश राधेश्याम सोनी (वय 26) व चंदन राधेश्याम सोनी (वय 19, दोघे रा. नालासोपारा) या दोघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा तिसरा साथिदार सुशिल ऊर्फ सुनिल माताप्रसाद सोनी (वय 37) पोलिसांच्या कारवाईपुर्वीच फरार झाला होता.
पोलिसांनी राकेश सोनी व चंदन सोनीची कसून चौकशी केल्यानंतर या दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांच्या चौकशीत त्यांच्या टोळीने अशाप्रकारचे आणखी 6 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. यात सातिवली येथील शांती ज्वेलर्स, फुलपाडा येथील रिषभ ज्वेलर्स, एव्हरशाईन येथील रिषभ ज्वेलर्स, माणिकपुरमधील मयंक ज्वलेर्स तसेच गालानगर येथील एका ज्वेलर्सचा समावेश आहे.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपींकडून 28 हजार 900 रुपये किंमतीचे नकली सोने व एक 51 हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली असुन त्यांच्याविरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच फरार आरोपीचा कसुन शोध घेण्यात येत आहे.