डहाणूतील दिवाणी न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात ३६ प्रकरणे निकाली

0
1733

IMG-20180715-WA0288प्रतिनिधी
           दि. १९ : डहाणू येथील दिवाणी न्यायालयात नुकतेच सह दिवाणी न्यायाधीश एस. ए. मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली आणि सह दिवाणी न्यायाधीश ओ. जे. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डहाणू तलासरी वकील संघटनेचे अध्यक्ष बी. एल. माछी, सचिव आर. एम. कडू आणि इतर सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती पुजनाने लोकन्यायालयाचे कामकाजाची सुरवात झाली.
            या लोकन्यायालयाचे कामकाज दोन पॅनेल्स समोर घेण्यात आले. यात डहाणू न्यायालयात विविध कलमान्वये दाखल असलेली २५४ प्रकरणे ठेवण्यात आली होती ज्यापैकी ३६ प्रकरणे निकाली होऊन, न वटलेल्या चेकच्या १९ प्रकरणात रक्कम रुपये १३ लाख ८० हजार ९११ रुपये एवढी रक्कम वसुल करण्यात आली. तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची अशी १,५२६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. ज्या मधील डहाणू पंचायत समितीच्या पाणी पट्टी वसुलीच्या ६०७ प्रकरणात ५ लाख ५० हजार ९४८ रुपयांची वसुली झाली तसेच डहाणूतील विविध बँकांच्या रक्कम वसुलीच्या ७ प्रकरणांमधील ९ लाख ७२ हजार २१५ रुपयांची वसुली झाली. विशेष बाब म्हणजे न्यायालयातील एका कौटुंबिक प्रकरणात न्यायाधीश एस. ए. मुळीक यांनी कुटूंबातील सर्व सदस्यांना समोर बसवून जवळजवळ एक तास समुपदेशन केले आणि प्रकरणात समझोता घडवून आणला.
            लोकन्यायालयाचे कामकाजात पॅनल सदस्य म्हणून विधिज्ञ सौ. श्रुती कुलकर्णी, सौ. बेबी गजभिये आणि समाज सेविका सौ. वैशाली चव्हाण यांनी काम पाहिले. लोक न्यायालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी एस. आर.परब, आर. यु. कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली.