जागा कोणाची?
वादग्रस्त जागेतील 5000 चौरस फूट क्षेत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाण जमिनीचे आहे. त्याच्या दक्षिण व पूर्व बाजूस काकरिया बिल्डर्सची जागा आहे. 5000 चौरस फूट क्षेत्राचा रस्त्यालगतचा मोक्याचा भूखंड काकरिया बिल्डर्सने तुर्तास पोटात घातला आहे.

हा भूखंड कसा घशात घातला?
11 नोव्हेंबर 2019 रोजी काकरिया बिल्डर्स यांनी आशागड ग्रामपंचायतीचे डंपींग ग्राऊंड असलेली जागा ही त्यांच्या मालकीची असल्याचा दावा करुन कुंपण टाकण्याची परवानगी मागितली. 13 नोव्हेंबर 2019 रोजी आशागड ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसेवक मनोज सारंगधर इंगळेने काकरिया बिल्डर्सकडे जा. क्र. 2019/20/200 च्या पत्रान्वये नवे डंपींग ग्राऊंड खरेदी करण्यासाठी 5 लाख देणगी मागितली. 14 नोव्हेंबर 2019 रोजी काकरिया बिल्डर्सने 5 लक्ष रुपयांचा एचडीएफसी बॅंकेचा धनादेश क्रमांक 000097 दिला. 23 तारखेला काकरिया बिल्डर्सला जा. क्र. 141/2019 अन्वये ना हरकत दाखला देण्यात आला. गावकऱ्यांना अंधारात ठेवून हे कारस्थान करण्यात आले.
दरम्यान, कचरा टाकण्यासाठी वापरली जाणारी जागा ही रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात असल्याने तेथे कचरा टाकणे बंद करण्याचा प्रस्ताव आशागड ग्रामसभेसमोर मांडण्यात आला व तसा ठराव मंजूर झाला. ह्या भूखंडावर व्यापारी गाळे बांधून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यावर ग्रामसभेचे एकमत झाले. ठरल्याप्रमाणे भूखंड कचरामुक्त करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात घडले उलटेच. 9 जानेवारी 2020 रोजी तेथे काकरीया नामक व्यक्तीच्या एजंटने कुंपण घालण्याचे काम सुरु केले. ग्रामस्थांनी ह्याबाबत रोष प्रकट केल्यानंतर व कामात अडथळा आणल्यानंतर ग्रामसेवक मनोज सारंगधर इंगळे याने त्यांच्या विरोधात पोलिसांकडे सरकारी कामात अडथळा आणल्याची व शिविगाळ केल्याची तक्रार केली. त्याच दिवशी गावच्या सरपंच मालती दौडा यांनी आंदोलक ग्रामस्थांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. पोलिसांना प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य न वाटल्याने गुन्हे दाखल न करता जागेची मोजणी करा व तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवा अशी समज दिली.
ग्रामपंचायतीचे बिल्डर बरोबर संगनमत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 13 जानेवारी रोजी काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस लेखी हरकत घेणारे पत्र दिले. व 14 जानेवारी रोजी माहितीच्या अधिकारात संबंधित विषयाची माहिती मागितली. आजपर्यंत माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. काहींनी अपील केले. कोव्हीड 19 च्या आपत्तीमुळे अपीलावर देखील सुनावणी झाली नाही. घोटाळेबाज इंगळेने ग्रामपंचायतीच्या दरवाजावर माहितीच्या अधिकारात 2 पेक्षा जास्त वेळा अर्ज केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद असल्याचे बोगस परिपत्रक लावून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. डहाणूचे गट विकास अधिकारी बबाराव भराक्षे हे इंगळेचे मामा असल्याने भाच्याचे पुरेपूर रक्षण होताना वेळोवेळी दिसले आहे.
पोलिसांनी गुन्हे दाखल करुन न घेतल्याने तक्रारी हा फुसका बार ठरला होता. आणि भूखंड प्रत्यक्षात बिल्डरचा नसल्याने त्याची मोजणी झाल्यास पितळ उघडे पडेल या भीतीने इंगळे आणि सरपंच दौडा यांनी 23 जानेवारी रोजी डहाणू पोलिसांना तक्रारी मागे घेत असल्याचे लेखी लिहून दिले. आणि मग लॉक डाऊन आणि जमावबंदी आदेशाचा गैरफायदा घेत कुठलीही जमीन मोजणी न करता जागेवर कुंपण घालण्यात आले.
ग्रामपंचायतीने देणगीतून जागा खरेदी केली का?
ग्रामपंचायतीने 5 लाखांच्या देणगीतून कुठलीही जागा खरेदी केलेली नाही. स्वतःच्या ताब्यातील 5 गुंठे क्षेत्राचा भूखंड बिल्डरला आंदण दिल्यानंतर ग्रामपंचायतीने 2 गुंठे क्षेत्राची जागा मिळवली आहे. ही 2 गुंठे जागा ग्रामपंचायत सदस्य विजय दुबळा यांनी आपल्या मालकीच्या सर्वे नं. 21/5 मधून बक्षिसपत्राद्वारे दिली आहे. हे बक्षिसपत्र नोंदणी केलेले नसून 100 रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी केलेले आहे. बक्षिसपत्र नोटरी करण्यासाठी गुजरात राज्यातील नोटरीची निवड केल्याचे दिसून येते.
महसूल विभागाची चौकशी
दरम्यान 21 जुलै रोजी मंडल अधिकारी गौरव बांगारा व तलाठी अनंत शेदड यांनी जागेवर भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल तहसिलदार यांना सादर केला आहे.