हर्झान रोहिंग्टन इराणी दमण दारु तस्कर?

0
2356

डहाणू / दि. २५: हर्झान रोहिंग्टन इराणी हा बिअर शॉपीच्या नावाखाली दमणच्या दारुची तस्करी करीत असल्याने त्याच्या आईच्या नावे असलेल्या डहाणू तालुक्यातील घोलवड (रायपूर) येथील अक्षय बिअर शॉपचे परमिट कायमस्वरूपी बंद करावे अशी शिफारस भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधिक्षकांकडे केली आहे.

भरारी पथकाने काल (२४) या बिअर शॉपीला भेट दिली असता त्यामध्ये अनेक अनियमितता आढळल्या. या दुकानात नोकरनामा आढळला नाही, नोंदवही भरलेली नव्हती, दुकानाला नियमबाह्य ३ दरवाजे आढळले, शेरेपुस्तिका उपलब्ध नव्हती, कॅश मेमो नव्हते, दुकानाच्या बाहेर चाईनिज सेंटर चालवून गिऱ्हाईकांना खाद्यपदार्थ पुरविण्याची बेकायदेशीर व्यवस्था करण्यात आली होती. बिअर शॉप मध्ये विना परवाना मद्य विक्रीसाठी ठेवल्याबद्दल यापूर्वी
हर्झान रोहिंग्टन इराणीवर पोलीसांकडे गुन्हे दाखल असल्याने व या परमिटच्या नावाने दमण दारुच्या तस्करीचा गोरखधंदा चालत असल्याने ही शिफारस केली आहे. तसेच या प्रकरणी दोषारोपपत्र देखील ठेवण्यात आले असून आता जिल्हा अधिक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.