वार्ताहर :
बोईसर, दि. 29
: तारापूर औद्योगिक परिसरातील सम्प नंबर तीनमध्ये वर्षोनुवर्षांपासून साठलेला रासायनिक घनकचरा (गाळ) सीईटीपी व टिमातर्फे युद्धपातळीवर काम करुन काढण्यात आला आहे. मात्र या घनकचर्याची अद्याप व्हिलेवाट लावली नसल्याने पावसाळा सुरु झाल्यास हा घनकचरा नाल्याद्वारे वाहत जाऊन खाडी व समुद्रात मिसळल्यास प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
तारापूर औद्योगिक परिसरात जवळपास दिड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी हे एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये (सीईटीपी) मध्ये सोडण्यात येते व येथे प्रक्रिया होऊन त्यातून निघणारा गाळ एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या 4 सम्पमध्ये साठवला जातो. यात एल, एम आणि एन झोनमधील कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेनंतर निघणारे रासायनिक सांडपाणी सम्प नं. 3 ला जोडले असून या सम्पची क्षमता पंधराशे क्यूबिक मीटर आहे. मात्र गेल्या 25 वर्षांपासून सम्पचा गाळ न काढल्याने या सम्पची साठवणुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
एमआयडीसीतून निर्मित होणार्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून तारापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना कारवाईचा मोठा दणका बसण्याच्या भीतीने अखेर सीईटीपी व टिमातर्फे काही दिवसांपुर्वी पोकलेन, जेसीबी व मजुरांद्वारे युद्ध पातळीवर काम करुन सम्प 3 मधील 300 ते 400 टन गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ सम्पच्याच बाजूला प्लास्टिक अंथरून त्यावर उन्हात सुकवला जात असुन पुढे मुंबई येथे वेस्ट मॅनेजमेंट विभागात नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. मात्र प्रमाणापेक्षा जास्त असलेल्या या गाळाची पावसाळ्यापुर्वी विल्हेवाट न लावल्यास आठवड्याभरावर आलेल्या पावसामुळे हा गाळ वाहून जाऊन संपूर्ण खाडी व समुद्रात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ या गाळाची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.
Home संग्राह्य बातम्या तारापूर एमआयडीसीतील रासायनिक घनकचर्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडण्याची भिती