- श्रमजीवींमुळे शोषित कुटूंबाने घेतला मोकळा श्वास
- आरोपी मालकाविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

दीपक गायकवाड/ मोखाडा, दि. 21 : कल्याण उल्हासनगर येथील एका मालकाने मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला वेठबिगार म्हणून बंधक बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असुन श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून सदर कुटूंबाची सुटका करण्यात आली आहे. या अन्यायग्रस्त कुटुंबाने मालकाच्या तावडीतून मुक्त होताच मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मोहन भीका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहन याचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी या ठिकाणी राहतात. पूर्वी ते भिवंडीतील पडघ्याला वीटभट्टीवर कामासाठी जायचे. मागील गणपतीच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले हा विटभट्टी मालक आपल्या वडिलांसोबत वाडीत आला होता. त्याच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या काही लोकांनी मोहनचे कुटुंब आणि योगेश वायले याची भेट करून दिली व यावेळी त्यांच्यात वायलेच्या विटभट्टीवर काम करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मालक चांगला आहे, या समजुतीने मोहनचे कुटूंब वायलेकडे कामावर जायला तयार झाले. त्यावेळेस त्याने या कुटूंबाला 3 हजार रुपये रोख बयाना दिला. त्यानंतर पुन्हा गणपती गेल्यावर काही दिवसांनी येऊन 10 हजार रुपये इतकी रक्कम देऊन मी घटस्थापनेनंतर घ्यायला येईन, असे सांगून गेला. नंतर ठरलेल्या दिवशी येऊन वायलेने मोहन, त्याचे आई-वडील, मुलगी गौरी (वय 7 वर्षे), बायडी (वय 9 वर्ष) आणि शैली (वय 13 वर्षे) असे संपुर्ण कुटुंब उल्हासनगर 5 नंबर येथे नेले व तिथे वीटभट्टीजवळील एका खोलीत त्यांना ठेवले. पुढच्या काही दिवसातच विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला – उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे तो त्यांच्याकडून करून घ्यायला लागला. सुट्या मजुराला (रोजंदारीच्या) 400 रुपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ 200 व महिलेला 100 मजुरी देऊन त्यांचे शोषण करु लागला होता. यावरच न थांबता स्वतःकडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणार्या मजुरीची पन्नास टक्के रक्कम वायलेने घेऊ लागला.
विशेष म्हणजे दिवाळी सण साजरा करण्यासाठी हे कुटूंब आपल्या मुळगावी आले असता वायलेने तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवले होते. त्यामुळे संपुर्ण कुटूंबाला पुन्हा उल्हासनगर येथे परतावे लागले. यानंतर तर या कुटूंबाचे योगेश वायले व त्याचा भाऊ राजू वायले अशा दोघांकडून अधिकच शोषण होऊन लागले. बाहेर मिळालेल्या 300 रुपये मजुरीतून 100 रुपये देणे व कधी-कधी तर तेही नाही, राजू वायलेकडून गौरीला मारहाण, शिवीगाळ, काम झाल्यावर मोहनसह त्याच्या आई व बहिणीला पाय धरायला लावणे, असे अत्याचार या कुटूंबावर होऊ लागले. पळून गेल्यास मालक जिवे ठार मारेन, या भितीतून निमूटपणे काम करत राहण्याशिवाय या कुटूंबाकडे पर्यायही नव्हता.
अखेर मोहन दिवेने याबाबत गावात माहिती दिल्यानंतर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. त्यानुसार मोखाड्यातुन पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह राजेश चन्ने, वासू वाघे इत्यादी कल्याण अंबरनाथ मधील कार्यकर्त्यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांची मदत घेत या पूर्ण कुटुंबाला त्यांच्या बिर्हाडासह मुक्त केले.
दरम्यान, मोहन दिवे याच्या फिर्यादीवरून मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये योगेश वायले, राजू वायले आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 3(1) व 6, बालमजूरी कलम 18(1) अ सह भारतीय दंड विधान संहितेचे कलम 342,504 व 506 अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.