वाडा नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्षापदी काँग्रेसच्या विशाखा पाटील

0
24833

वाडा नागरपंचायतीतही महाविकास आघाडी

प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाखा पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वैभव भोपतराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐन वेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

वाडा नगरपंचायतीमध्ये एकुण 17 सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आरपीआय यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून वाडा नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार उपनगराध्यक्ष पद काँग्रेसकडे देण्यात आले आहे.

वाडा नगरपंचायतीचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आला आहे. या पदावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा यांचा पराभव करत शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर विराजमान झाल्या आहेत. दरम्यान, तत्कालीन काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा भारती सपाटे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदावर आज निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाखा पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत.