वाणगावमध्ये 30 ते 35 गाईंचा संशयास्पद मृत्यू

0
1588

वार्ताहर/बोईसर, दि. 27 : डहाणू तालुक्यातील वाणगावमध्ये 30 ते 35 मोकाट गाईंचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. येथील माटगाव गावाच्या परिसरात सदर गाईंचे मृतदेह आढळून आले असुन एखाद्या बागायतदाराने विषप्रयोग करुन या गाईंची हत्या केल्याचा अंदाज येथील गावकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माटगावच्या आसपास मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व मिरची बागायती आहेत. त्यात भाजीपाल्यासह अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या सुमारास 60 ते 70 मोकाट गाईंचा तांडा कुंपण तोडून किंवा उड्या मारून बागेत घुसतात आणि बागच्या बाग फस्त करून टाकतात. त्यामुळे संबंधित बागायतदारांचे प्रचंड नुकसान होते. यालाच कंटाळून एखाद्या बागायतदाराने भाजीपाल्यांमध्ये थायमेटसारखे जहाल कीटकनाशक वापरून या मोकाट गाईंना ठार मारल्याची शक्यता गावकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

माटगाव पसिरातील शेतात, गवतात आणि झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, या 30 ते 35 मृत गाईंचे मृतदेह आढळून आले असुन या घटनेनंतर जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विषप्रयोगाने या गाईंचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी शवविच्छेदनानंतरच या मृत्यूंमागचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वाणगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत पोलीस पोलीस अधिक तपास करत असून, पशुवैद्यकीय अधिकार्‍याकडून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.