
राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 19 : जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील घोटाळ्यांची रोज नवनविन प्रकरणे बाहेर येत असुन काल, गुरुवारी पुन्हा 6 घोटाळ्यांप्रकरणी संबंधित शासकिय अधिकारी व संस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजनांमध्ये गैरव्यवहार करुन एकुण 19 लाख 63 हजार रुपयांवर घोटाळेबाजांनी डल्ला मारला आहे.
सन 2004 ते 2009 दरम्यान आदिवासींच्या विकासासाठी शासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ न देता केवळ कागदांवर योजना राबवून कोट्यावधींची रक्कम घोटाळेबाजांनी लाटली आहे. बुधवारीच (दि. 19) पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर यापुर्वी सुमारे 3 कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील माजी प्रकल्प अधिकारी आय. एन. खाटीक, आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील तत्कालीन अपर आयुक्त (नाव समजू शकलेले नाही) अशा बड्या अधिकार्यांसह विविध संस्था व साहित्य पुरवठादार ठेकेदारांवर गुन्हे नोंदवण्यात आले असुन या घोटाळ्यांचा आकडा 5 कोटींहून पुढे पोहोचला आहे.

2008-2009 मध्ये विविध कालावधीत आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या स्पर्धात्मक परिक्षापुर्व प्रशिक्षण योजनेत एकुण 11 लाख 92 हजार, सन 2007 ते 2008 दरम्यान राबविण्यात आलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण योजनेत 1 लाख 30 हजार, सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेत 88 हजार तसेच सन 2006 व 2007 मध्ये आदिवासी युवकांना संगणक प्रशिक्षण योजनेत अनुक्रमे 2 लाख 1 हजार व 3 लाख 50 हजार अशा एकुण 19 लाख 63 हजार रुपयांच्या 6 घोटाळ्यांप्रकरणी काल, गुरुवारी जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या तक्रारीवरुन जव्हार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- नाशिक येथील करिअर अकॅडमी, जव्हार येथील माँ साहेब शैक्षणिक संस्था, प्रगती कॉम्प्युटर्स व हाय व्हिजन कॉम्प्युटर एज्युकेशन आदी संस्थांसह संबंधित शासकिय अधिकार्यांविरोधात काल हे गुन्हे दाखल करण्यात आले.