हॅप्पी बर्थ डे राजूभाई! तुम्हाला श्रद्धांजली देत नाही…. कारण तुम्ही अमर आहात!

0
2821

संजीव जोशी, संपादक – दैनिक राजतंत्र

दि. 16 नोव्हेंबर 2020: आमचे परममित्र, दि डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केचे अध्यक्ष, वकील मॉडेल स्कूलचे (एच.एम.पी. स्कूल) अध्यक्ष, लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष, डहाणूचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी केव्हाही मदतीचा हात देण्यासाठी तत्पर कार्यकर्ता स्वर्गीय राजेशभाई पारेख यांचा आज जन्मदिन. आज नवीन वर्षाच्या आणि जन्मदिनाच्या एकत्रित शुभेच्छा स्विकारण्यासाठी ते आपल्यात नाहीत. त्यांचा महिनाभरापूर्वी (7 ऑक्टोबर 2020 रोजी) झालेला अकाली मृत्यू राजकारण, समाजकारण, शिक्षणक्षेत्र, सहकार क्षेत्र अशा कितीतरी क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण करणारा ठरला आहे. राजेशभाईंच्या अकाली जाण्याने पारेख कुटूंबीयांचे, माझे वैयक्तिक आणि राजेशभाईंच्या मित्रमंडळींचे अपरिमित नुकसान झाले आहेच. पण अशा वैयक्तिक नुकसानीची कुरकुर करणे म्हणजे त्यांच्या अफाट व्यक्तीमत्वाचा स्वार्थीपणाने संकोच करण्यासारखे आहे. राजेशभाईंच्या निधनामुळे डहाणू तालुक्यानेच नव्हे तर पालघर जिल्ह्याने एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे. असा कार्यकर्ता की ज्याची जागा दुसऱ्याला घेणे केवळ अशक्यच आहे.

राजेशभाई आणि माझी मैत्री राजकारणाच्या पलिकडची होती. मी व्यक्तीश: राजेश पारेख यांच्यापासून प्रभावित होतो. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे होते. त्यातील झेपेल ते शिकत होतो. राजेशभाई हा नेता कमी आणि कार्यकर्ता जास्त होता. किंबहुना त्यांच्या ह्या गुणाला मी अनेकदा अवगुण संबोधून नेहमीच तक्रारी करीत होतो. एखाद्या ठिकाणी जर आग लागली असेल, तर राजेशभाई तुम्हाला कार्यकर्त्यांना सूचना देताना किंवा चमकोगिरी करताना दिसणार नाहीत. ते तुम्हाला मैदानात उतरुन हातात पाण्याची बादली घेऊन आग विझवताना दिसतील. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला स्वतः ड्राईव्ह करुन हॉस्पिटलमध्ये पोचवताना दिसतील. या कार्यकर्ता असण्याच्या गुणाला मी अवगुण अशासाठी मानत होतो की, ह्या खणखणीत वाजणाऱ्या नाण्याचा आवाज ऐकवून काहींनी स्वतःची न चालणारी नाणी चलनात आणली आणि राजेश पारेख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून तालुका अध्यक्षपदापर्यंतच सिमीत राहिले. त्यांना बढती अशी मिळालीच नाही. त्यांच्या जोरावर अनेक जण खूप पुढे निघून गेले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना ही बाब सतत खटकत राहिली. मात्र पक्षाशी आणि मा. शरद पवार यांच्यावरील निष्ठेपोटी राजेशभाई नेहमीच संयमी भूमिकेत राहिले.

राजेशभाईंचा मित्रपरिवार (मी त्यातलाच होतो) त्यांना केव्हाही जाब विचारत असे. त्यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त करीत असे. राजेशभाई मात्र खूप समजूतदारपणे संवाद साधत. राजेशभाईंचे सहकारी त्यांच्याकडे हट्ट करु शकत होते. राजेशभाई मात्र एखादे काम सांगताना इतक्या विनम्रतेने विनंती करीत असत की त्या स्वभावाला तोड नाही. सर्वच क्षेत्रात कर्तबगारीची उंची गाठलेले, आपले कर्तुत्व सिद्ध केलेले राजेशभाई, माझ्या सारख्या सर्वसाधारण व्यक्तीकडून एखादा विषय समजून घेताना त्यांना जराही कमीपणा वाटत नसे. राजेशभाईंनी माझ्या पत्रकारितेमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा माझी पत्रकारिता वापरण्याचा प्रयत्नही केला नाही. माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. त्यांच्या मनाविरुद्ध भूमिका घेतली म्हणून कधी नाराज झाले नाहीत. अनेकदा मी पत्रकारितेच्या माध्यमातून घेतलेल्या भूमिकेचा त्यांना लाभही झाला असेल. कधीतरी मी घेतलेल्या भूमिकांच्या मागे त्यांचा हात असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यातून त्यांच्यासाठी समस्याही निर्माण झाल्या असतील. माझ्या पत्रकारितेमुळे दुखावले गेलेले काही जण राजेशभाईंवर ठपका ठेवत असत. परंतु आमच्या मैत्रीवर त्याचा कधीही परिणाम झाला नाही. मी राजेशभाईंकडे झुकलो होतो असे कोणाचे आरोप असतील तर ते खरेच होते. ते मला मान्यच आहेत. पण माझ्या त्यांच्याप्रती झुकण्यामागे त्यांची फूस नव्हती तर त्यांची कर्तबगारी होती. योग्य बाजूने झुकण्याचे मी समर्थनच करतो. त्यात मला कमीपणा कमी आणि अभिमान जास्त वाटेल. कारण मी राजेशभाईंच्या असामान्य व्यक्तीमत्वाने प्रभावित होतोच आणि यात नाकारण्यासारखे काही नाही.

राजकारणातील प्रामाणिकपणा

राजकारणात प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे महत्वाचे गुण राजेशभाई यांच्याकडे होते. त्यांच्याशी राजकारणात अनेकदा दगाफटका झाला. परंतु राजेशभाईंकडून दगाफटका झाल्याचे उदाहरण नव्हते. त्यांच्या भूमिका कोणाला पटतील किंवा न पटतील, मात्र त्या उघड आणि स्पष्ट असायच्या. एकवेळ ते मुत्सद्दी वागतील, मात्र घुमजाव करणार नाहीत. 1993 पासून ते सक्रीय राजकारणात आहेत. एकदा त्यांच्या नगरपरिषदेतील स्वीकृत सदस्यपदासाठीची संधी राजकारणातील दगाफटक्याने हिरावली गेली. कधीकाळी त्यांच्या नेतृत्वाखाली डहाणूरोड जनता बॅंकेची निवडणूक लढवली गेल्यानंतर त्यांच्याशी दगाफटका करुन त्यांना बाजूला सारण्यात आले. पण प्रत्येकवेळी त्यांनी कमबॅक केले. आयुष्यातील एक चूक मात्र त्यांना कायमची धडा शिकवणारी ठरली. 12 वर्षांपूर्वी व्यवहारात त्यांच्याशी मोठा विश्वासघात झाला. तेव्हापासून त्यांचा संघर्ष सुरु होता. त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मृत्यूपश्चात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आपल्या शिलेदाराला पूर्ण सन्मान दिला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते श्री शरद पवार हे पारेख परिवाराच्या सांत्वनासाठी डहाणूत आले. त्यांच्या कुटूंबीयांशी चर्चा केली. राजेशभाईंच्या अपूर्ण राहिलेल्या व्यवहाराचा तपशील समजून घेतला आणि तेथून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर लगेचच सुत्रे हालवली. श्री शरद पवार यांनी गांभीर्याने घेतलेला प्रश्न आता अनुत्तरित राहणे शक्यच नाही. तो सुटलाच असे समजायला हरकत नाही. खंत इतकीच आहे की नियतीने हा प्रश्न राजेशभाईंच्या हयातीत सोडवला असता तर ते अल्पायुषी ठरले नसते.

हा मृत्यू नव्हे, त्याग आहे

कोरोनाच्या संसर्ग काळात राजेशभाई हा खराखुरा कोव्हिड योद्धा होता. लॉक डाऊनच्या काळात जिकडेतिकडे अडकलेल्या लोकांसाठी हा योद्धा सतत रस्त्यावर कार्यरत राहिला. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवत राहिला. अत्यावश्यक सेवेचा भाग बनून राहिला आणि त्यातून सर्वतोपरी काळजी घेऊनही त्यांना कोरोनाचा संसर्ग टाळता आला नाही. लोक संकटात असताना घरी बसून रहाणे या योद्ध्याला मान्यच नव्हते. कोरोनाचे उपचार घेऊन लढाई जिंकल्यानंतर हा योद्धा पुन्हा मैदानात उतरला. लोकांना धीर देऊ लागला. पुन्हा एकदा सर्वतोपरी साहाय्य करु लागला. इतर कोव्हिडग्रस्तांना जीवदान देण्यासाठी प्लाझ्मा दान केले व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त केले. खरेतर त्यांना विश्रांतीची गरज होती. मात्र कोरोनाच्या जागतिक संकटात विश्रांती घेणे त्यांना शक्य नव्हतेच. ते लोकांसाठी लढतच राहिले आणि हृदयविकाराचे शिकार ठरले.

किती जगले ह्या पेक्षा कसे जगले हे महत्वाचे!

राजेश पारेख अल्पायुषी ठरले. अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. परंतु या काळात त्यांनी जमा केलेला जनसंपर्क प्रचंड होता. त्यांनी खूप मोठे कार्य उभे केले. एखाद्याला पाऊणशे वर्षाच्या आयुष्यात जे जमणार नाही ते राजेशभाईंनी अल्पायुष्यात करुन दाखवले. त्यांचे वडील स्वर्गीय हसूभाई पारेख यांनी सुरु केलेला समाजकारणाचा वारसा राजेशभाईंनी पुढे नेला. आता हा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचा मुलगा वरुण सज्ज झाला आहे. वडीलांच्या कार्याने प्रभावित होणे स्वाभाविकच होते. पारेख कुटूंबीयांचा वारसा व गुणसूत्र लाभलेल्या वरुणच्या बाबतीत ” बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ” ह्या म्हणीचा प्रत्यय येताना दिसतो आहे. वरुणमधील आत्मविश्वास पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसने युवा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. राजेशभाईंनी दिलेल्या शिकवणीनुसार वरुण या संधीचे सोने करुन एक सद्गुणी समाजकारणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल यासाठी त्याच्या वाटचालीला शुभेच्छा!
हॅप्पी बर्थ डे राजूभाई! तुम्हाला श्रद्धांजली देत नाही…. कारण तुम्ही अमर आहात!