चिंचणी : गोहत्येच्या आरोपावरुन 3 जणांना अटक

0
2308

वार्ताहर/डहाणू, दि. 13 : चिंचणी खाडी नाका परिसरातील रिफाई मोहल्ला येथे काल (दि. 12) बकरी ईदच्या निमित्ताने सायंकाळी मोठ्या प्रमाणात गाईंची कत्तल केल्याच्या संशयावरून धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीसांनी जबाबदारीने परिस्थिती हाताळून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. या प्रकरणी पोलीसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून गोहत्येचे अवशेष खड्ड्यात पूरुन पुरावे नष्ट करण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेला जेसीबी देखील जप्त करण्यात आला आहे.

बजरंग दलाच्या व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर संपूर्ण तारापुर चिंचणी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक तेढ निर्माण झाली होती. पोलिसांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची भुमिका घेतल्यानंतर वातावरण निवळण्यास हातभार लागला. या प्रकरणी वाणगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, प्राण्यांचे परिवहन अधिनियम 1978 व भारतीय दंड संहिता 1860 नुसार वेगवेगळ्या 13 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिली असली तरी नावे उघड केलेली नाहीत. अवशेष गाडण्यासाठी खड्डा करण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे.

पोलिसांनी तपास करून तिन संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत गुन्हा केल्याचे उघड झाल्यास त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.
-राहुलकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाणगाव पोलीस स्टेशन