सफाळ्यातील महत्वाच्या ठिकाणांवर आता सीसीटिव्हींची नजर

0
2670

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या हस्ते लोकार्पण

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 16 : येथील प्रगती प्रतिष्ठान व व्यापारी वर्गाने केलेल्या आर्थिक मदतीतून तसेच पालघरमधील युनिवर्क एंटप्रायझेसच्या सहकार्यातून सफाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी 36 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सफाळ्यात प्रवेश करणार्‍या वाहनांवर किंवा इसमांवर सफाळ्यात प्रवेश केल्यापासुन बाहेर पडेपर्यंत लक्ष ठेवता येणार असुन यामुळे येथील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास मोठी मदत होणार आहे. काल, स्वातंत्रदिनानिमित्त पालघरचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांच्या हस्ते या सीसीटिव्ही कॅमेर्‍यांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंगची व्यवस्था

दरम्यान, सफाळा बाजारपेठेत उद्भवणार्‍या सततच्या वाहतुक कोंडीला पर्याय म्हणुन उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायत व सफाळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सफाळा पुर्व बाजारपेठेतील ओम टी सेंटर ते आराधना स्टोअर्सपर्यंत पी-1/पी-2 पद्धतीने पार्किंगची संकल्पना राबविण्यात येत आहे. या पार्किंग व्यवस्थेचे देखील काल पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी पालघरचे उप विभागीय अधिकारी विकास नाईक, प्रगती प्रतिष्ठानचे प्रविण राऊत तसेच सफाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव, उपसरपंच राजेश म्हात्रे, बाजारपेठेतील व्यापारी वर्ग व परिसरातील पत्रकार उपस्थित होते.