लॉकडाऊनचे लाभार्थी: ग्रामसेवक इंगळेने ग्रामपंचायतीचा भूखंड बिल्डरच्या घशात घातला!

दि. 16 जुलै: डहाणू तालुक्यातील आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीत एसटी स्टॅंड जवळ खाण जमीन आहे. मागील 50 पेक्षा जास्त वर्षांपासून ही जमीन मोकळी असून ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. लगतच्या जमीनमालकाने ही जागा सोडूनच स्वतःच्या जागेभोवती कुंपण घातले होते. त्याच जागेत आशागड ग्रामपंचायत गेल्या 20 वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावत आहे. असे असताना मनोज सारंगधर इंगळे ह्या ग्रामसेवकाकडे आशागड ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार दिल्यानंतर एका बिल्डरला ती जागा स्वतःची असल्याचा साक्षात्कार झाला. त्याने इंगळेशी संधान बांधले आणि हा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी प्रयत्न हाणून पाडला होता. परंतु त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाले. ह्या प्रकरणाची चोकशी होऊ शकली नाही. उलट जमावबंदीचे आदेश निघाले आणि इंगळेने डाव साधला. कुठल्याही प्रकारची जमीन मोजणी न करता बिल्डरच्या घशात भूखंड घातला आहे. मनोज इंगळे आणि जागा हडपणारा बिल्डर लॉकडाऊनचे लाभार्थी ठरले आहेत.

(28 जानेवारी 2020 रोजी mahanews.com वर प्रसिद्ध झालेली बातमी) बिल्डरला नको असलेला कचरा डेपो हटविण्यासाठी लाखोंचा मलिदा कमावला!


आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीत एसटी स्टॅंड जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची खाण जमीन आहे. त्या जागेत आशागड ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा विल्हेवाट लावत आहे. या जागेतून कचराडेपो हलविण्यासाठी इंगळे याने संबंधित बिल्डरकडून 12 लाख रुपये देणगी घेतली. दर्शनी भागातून कचरा डेपो इतरत्र हलवावा यासाठी ग्रामस्थांची अनुकूलता होती. मात्र इंगळेने ही जागा बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामस्थांकडून विरोध झाला. यातून इंगळेने पोलीसांकडे शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवून खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या प्रकरणात देणगी म्हणून मिळालेले 12 लाख रुपये इंगळेने बॅंकेतून कॅश विथड्रॉवलने काढले आणि त्याची विल्हेवाट लावली. हे पैसे त्याने स्वतःच्या ड्रायव्हरमार्फत काढले आहेत. डिजिटल इंडियाच्या युगात इंगळेने इतकी मोठी रक्कम बॅंकेतून रोखीने का काढली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.