वाड्यातील गोधडीची उब सातासमुद्रापलिकडे

0
2844
  • हमरापुरच्या बचत गटांनी बनविलेल्या गोधड्या पाहोचल्या इंग्लंड, अमेरिकेला
  • गोधडी प्रकल्पाला माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : तालुक्यातील हमरापुर येथील ओमगुरुदेव महिला बचत, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, प्रगती ’अ’ महिला बचत गट, एकवीरा महिला बचत गट व साईलीला महिला बचत गट या पाच महिला बचत गटांनी मिळून तयार केलेली गोधडी साता समुद्रापलिकडे गेली असून या गोधडीची उब इंग्लंड, अमेरिकेतील नागरिकही घेत आहेत. तर या गोधडीला तेथील नागरिकांनी ’हमरापूरची राणी’ हे नाव देखील बहाल केले आहे. त्यामुळे या पारंपारिक मराठमोळ्या गोधडीला चांगलेच प्रसिद्ध वलय प्राप्त होत आहे.

दिड हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या हमरापुर या गावातील महिला बचत गट हे नेहेमीच कापडी पिशवी, कपड्यांपासून पायपुसणी, लोकरीचे तोरण, रुमाल, महिलांचे मेकअपचे साहित्य अशा नाविन्यपुर्ण वस्तु बनवून ते विक्री करीत असतात. गेल्या तीन वर्षांपासुन या बचत गटातील दहा महिलांनी एकत्र येऊन विशेष वैशिष्ट असलेली गोधडी शिवून तिची विक्री करणे हा व्यवसाय सुरु केला आहे.

हमरापुर गावापासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज या ठिकाणी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असतात. त्यांच्यापर्यंत ही गोधडी येथील महिलांनी पोहचविली आणि अमेरिकेमधील पर्यटकांना या गोधडीची उब चांगलीच भावली. थंडीपासुन संरक्षण करणार्‍या अन्य वस्रांपेक्षा या गोधडीमधील उब खुपच चांगली मिळत असल्याने त्यांनी या बचत गटाकडून शंभरहुन अधिक गोधड्या विकत घेऊन त्या सातासमुद्रा पलिकडील त्यांच्या देशातही नेल्या आहेत.

नुकत्याच मुंबई येथे झालेल्या लक्ष्मी सरसमध्ये या बचतगटाने 35 हजार रुपयांच्या गोधड्यांची विक्री केली. या गोधड्यांची विक्री करुन या बचत गटातील प्रतिक्षा पाटील व हर्षाली पाटील या महिला एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत तर त्या वाडा, विक्रमगड या तालुक्यांतील अनेक गावात जाऊन तेथील महिलांना देखील अशा प्रकारच्या गोधड्या शिवण्याचे प्रशिक्षणही देत आहेत.

चांगल्या दर्जाचा रंगीत कपडा घेऊन सहा फुट लांब, सहा फुट रुंद अशी या कपड्यापासुन मोठी पिशवी तयार केली जाते. या पिशवीमध्ये चांगल्या दर्जाचा रजईचा कापुस दिड ते अडिच किलो वजनापर्यंत भरुन या गोधडीला सुताचा धागा घेऊन हाताने शिवली जाते. वजनाला अत्यंत हलकी असलेली ही गोधडी अत्यंत कमी तापमानामध्ये तर फार उपयुक्त तर आहेच पण अधिक तापमानामध्येही या गोधडीचा वापर केल्यास कुठलाही त्रास होत नाही. एक गोधडी बनविण्यासाठी 600 ते 700 रुपये खर्च येतो आणि ती 1000 ते 1200 रुपयांपर्यंत विक्री केली जाते. तसेच या गोधडीची धुलाई वारंवार करता येत असुन ती चार ते पाच वर्षे सहज टिकते, असे ओमगुरुदेव बचत गटाच्या सचिव हर्षाली पाटील यांनी सांगितले.

शासनाने या गोधडी व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली तर अनेक बचत गटातील महिलांना निश्चित कायमचा रोजगार मिळेल.
-प्रतिक्षा प्रमोद पाटील, अध्यक्षा, ओम गुरुदेव महिला बचतगट, हमरापुर, ता. वाडा

माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांची प्रकल्पाला भेट

दरम्यान, या गोधडी प्रकल्पाविषयी माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आरोग्य डॉ. मंत्री दीपक सावंत यांनी आज, मंगळवारी (दि. 11) हमरापूर येथे सपत्नीक येऊन या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला आणि प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या व्यवसायाशी संबंधित समस्याही जाणून घेतल्या. या बचत गटांना अधिक मार्केटिंग व प्रकल्पाचा प्रचार व्हावा म्हणून आपण या बचत गटांचे विलेपार्ले येथे लवकरच प्रदर्शन भरवणार असल्याचे सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाविषयी माहिती देऊन या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल, कापूस, कपडा व मार्केटिंगसाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी विनंती करणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा सहसमन्वयक गोविंद पाटील, तालुका समन्वयक प्रकाश केणे, तालुका सचिव निलेश पाटील, शहर प्रमुख नरेश चौधरी, जेष्ठ कार्यकर्ते भालचंद्र (बाळू) किणी, महिला आघाडीच्या स्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.