डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

0
2042

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला असून आज, रविवारी पहाटे काही भागांमध्ये 3.8 रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांची झोप उडवली.

डहाणू तालुका हा भूकंपग्रस्त तालुका समजला जातो. गेले वर्षभर येथील धुंदलवाडी, हळदपाडा, बहारे, वंकास यांसारख्या भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. काही दिवसांपासुन भूकंपाचे धक्के बंद झाल्याने या भागातील नागरीकांना दिलासा मिळाला होता. मात्र 12 डिसेंबर रोजी संध्याकाळपासून पुन्हा सतत भूकंपाचे धक्के सुरू झाले व आज पहाटे 5 च्या दरम्यान 3.8 रिस्टर स्केल तीव्रतेच्या मोठ्या धक्क्याची नोंद झाली. यामुळे बोर्डी, धामणगाव, बोरीगाव, करजगाव, मानपाडा, अस्वली, कैनाड व गांगणगावसह तलासरीपर्यंतचा भाग हादरला. दरम्यान, भूकंपाच्या या धक्क्यानंतर कोणत्याही प्रकारच्या वित्तहानी किंवा जीवितहानीचे वृत्त नसले तरी नागरीकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.