बोईसर : उपचाराअभावी रुग्णाने रिक्षातच सोडले प्राण

संपुर्ण जिल्ह्यात केवळ 3 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध!

0
3179

बोईसर, दि. 26 : वाढत्या करोना रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये बेड्स शिल्लक नसल्याने रुग्णाला उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागल्याच्या अनेक बातम्या रोजच देशभरातून वाचायला येत असतानाच असाच एक प्रकार बोईसर शहरात घडला आहे. श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये फिरुन देखील कुणीही उपचारासाठी दाखल करुन न घेतल्याने एका 55 वर्षीय व्यक्तीने रिक्षातच आपले प्राण सोडल्याची घटना घडली आहे.

सिरंग गावडे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असुन ते बोईसरमधील दांडीपाडा येथील रहिवासी होते. सिरंग यांना शनिवारी (25 एप्रिल) सकाळी श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची पत्नी व मुलाने त्यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. यावेळी शहरातील वरद हॉस्पिटल, शिंदे हॉस्पिटल, चिन्मया हॉस्पिटल, तुंगा हॉस्पिटल अशा सर्वच मोठ्या रुग्णालयांनी बेड्स उपलब्ध नसल्याचे कारण देत सिरंग यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांना तशाच अवस्थेत बोईसरपासुन 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागझरी येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेही बेड्स उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. वेळेवर उपचार न मिळल्याने तब्येत आणखीनच खालावल्याने दुपारी 3 च्या सुमारास रिक्षातच सिरंग यांनी प्राण सोडले. विशेष म्हणजे या घटनेची स्थानिक प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली न गेल्याने सुमारे 4 ते 5 तास सिरंग यांचा मृतदेह तसाच रिक्षात पडून होता.
दरम्यान, सिरंग यांची मृत्यूपुर्वी करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तर दुसर्‍या चाचणीचा अहवाल दोन दिवसांनतर मिळणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियांकडून सांगण्यात आले.

संपुर्ण जिल्ह्यात केवळ 3 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध
पालघर जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही खाजगी रुग्णालयांमध्ये समर्पित (डेडिकेटेड) कोव्हिड सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये आजच्या घडीला एकही आयसीयू व व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध नसल्याचे याबाबत माहिती देणार्‍या अधिकृत संकेतस्थळावर दिसुन येते. तर बोईसरमधील चिन्मया रुग्णालयामध्ये आज, सोमवारी 3 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध असल्याचे दर्शवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थाही ढासाळल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार चिन्मया रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.