डहाणू, दि. 21 : पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर काल, रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. विशेष करुन गड-किल्ल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने येथे करोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन झाल्याचे दिसुन आले. अशाचप्रकारे डहाणू तालुक्यातील अशेरी गडावर पर्यटनासाठी गेलेल्या 24 जणांवर कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यात करोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विविध प्रतिबंधात्मक नियमांसह खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे काल सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटक दाखल झाले होते. यात बाहेरील जिल्ह्यांमधून आलेल्या पर्यटकांचा देखील समावेश होता. पावसाळा सुरु झाल्याने विशेष करुन गड-किल्ल्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसुन आली. दरम्यान, करोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असताना करोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबाबत प्रतिबंधात्मक आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. मात्र अनेक पर्यटकांनी हे आदेश पायदळी तुडवल्याचे पहायला मिळाले. डहाणूतील अशेरी गडावर देखील काही पर्यटकांनी करोना नियमांचा भंग केल्याने त्यांच्यावर कासा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन यात 24 पर्यटकांचा समावेश आहे.