पालघर, दि. 22 : भूसंपादनाचा मोबादला मिळवून दिला म्हणून 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकार्यांना पालघर लाचलूचपत विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. भूसंपादन सहाय्यक अंकुश पुरुषोत्तम पाटील (वय 37) व अव्वल कारकून वर्षा मनोहर पानझडे पाटील अशी सदर लाचखोर अधिकार्यांची नावे आहेत.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय तक्रारदार यांचे राहते घर विरार-डहाणू रेल्वेच्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आले आहे. त्याचा मोबादला म्हणून त्यांना 6 लाख 36 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. मात्र हा मोबदला मिळवून दिला म्हणून अव्वल कारकून वर्षा पानझडे पाटील यांनी भूसंपादन सहाय्यक अंकुश पाटील याच्यामार्फत तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने पालघर एसीबीकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार 18 जून रोजी एसीबीद्वारा पंचासह या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर सदर अधिकार्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. अखेर पडताळणीदरम्यान ठरल्याप्रमाणे काल, 21 जून रोजी पालघर रेल्वे स्टेशन परिसरात एसीबीने सापळा रचून अंकुश पाटीलला लाच घेताना रंगेहाथ अटक केली व यानंतर वर्षा पानझडे पाटीलला ताब्यात घेण्यात आले.
पालघर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार मांजरेकर, पोलीस नाईक चव्हाण, सुतार, सुमडा, पोलीस शिपाई उमतोल व दोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, दोन्ही लाचखोर अधिकार्यांवर पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.