प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आरोपी पत्नीसह प्रियकरला अटक

0
1833

पती बेपत्ता झाल्याचा रचला होता बनाव

राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 19 : अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करुन पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने पती हरवल्याचा बनाव रचणार्‍या आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला बोईसर पोलीसांनी अटक केली आहे. अनिलकुमार छेदुकुमार रावत (वय 32) असे खून झालेल्या इसमाचे नाव असुन रामप्रकाश ऊर्फ सोनु असे सदर आरोपीचे नाव आहे. आरोपी पत्नीचे नाव मात्र समजू शकलेले नाही.

मृत अनिलकुमार छेदुकुमार रावत याच्या पत्नीने 15 फेबु्रवारी 2019 रोजी आपले पती अनिलकुमार रावत बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. बोईसर पोलीस याप्रकरणी तपास करत असतानाच दुसर्‍या दिवशी (दि. 16) बोईसर एमआयडीसीलगतच्या शिवाजीनगर भागात निर्जण स्थळी हत्या करुन फेकुन दिलेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सदर मृतदेहाची ओळख पटवली असता बेपत्ता असलेल्या अनिलकुमार रावत यांचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार करुन या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र आरोपीने गुन्हा केल्यानंतर मागे कोणताही पुरावा सोडला नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता. अखेर पोलीसांनी आरोपीच्या पत्नीवर संशय व्यक्त करुन अनिलकुमार रावत यांच्या घराची झडती घेतली असता घरातील एका भिंतीवर रक्ताचे शिंतोडे पोलीसांना आढळून आले व गुन्ह्याचे धागेदोरे पोलीसांच्या हाती आले.

यानंतर पोलीसांनी अनिलकुमार यांच्या पत्नीला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता रामप्रकाश ऊर्फ सोनु या आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याची तसेच पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने पती बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवल्याची कबुली तिने दिली. दरम्यान, अंधेरी एमआयडीसीमध्ये कामाला असलेला तिचा प्रियकर रामप्रकाश याला पोलीसांच्या एका पथकाने तात्काळ अटक केली असुन त्यानेदेखील गुन्ह्याची कबुली दिली आहे.

बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जगताप, पोलीस उपनिरीक्षक मेहेंदळे, पोमण, इनामदार, पोलीस हवालदार सरदार, पोलीस नाईक कैलास पाटील, राहुल पाटील व म्हस्के यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणला.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा