कन्यादान योजना व म्हशी खरेदी वाटप योजनेत 69 लाखांचा अपहार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : नुकतेच जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील कोट्यावधींचे घोटाळे उघडकीस आले असताना आता डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्पातही भ्रष्ट्राचार झाल्याचे पुढे आले असुन शासनातर्फे आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या म्हशी वाटप व कन्यादान योजनेत सुमारे 69 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित बातमी :- आदिवासींच्या विकासाच्या नावावर भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल
सन 2006 व 2007 दरम्यान हे घोटाळे झाले असुन डहाणू आदिवासी प्रकल्पाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकार्यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारींनुसार सन 2006-07 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेली कन्यादान योजना व म्हशी खरेदी वाटप योजनेची अंमलबजावणी करताना संबंधित अधिकार्यांनी गरीब आदिवासी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ न देता परस्पर कन्यादान योजनेत 30 लाख 10 हजारांचा तर म्हशी खरेदी वाटप योजनेत 38 लाख 84 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
या घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकार्यांविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 409 व 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
दरम्यान, नुकतीच जव्हार आदिवासी विकास प्रकल्पात सन 2006 ते 2010 दरम्यान आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांची एकामागे एक अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. तब्बल 3 कोटींच्या आसपास असलेल्या या घोटाळ्यांप्रकरणी जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील माजी प्रकल्प अधिकारी आय. एन. खाटीक यांच्यासह विविध संस्था व साहित्य पुरवठादार ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.