
राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 4 : जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील माजी प्रकल्प अधिकारी आय. एन. खाटीक यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध संस्था व साहित्य पुरवठादार ठेकेदारांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले असुन खाटीक यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील तत्कालीन अपर आयुक्त (नाव समजू शकलेले नाही), नवी मुंबईतील इंडो इस्त्राईल अॅग्रो इंडस्ट्रिजचा अध्यक्ष आदींसह नाशिक येथील जोशाबा स्वयंराजेगार संस्था, विक्रमगड येथील श्रीराम इन्स्टिट्यूट संस्था व शिवणयंत्र पुरवठा करणारी भुसावळ येथील जैन अॅण्ड कंपनी यांच्या संचालकांविरोधात जव्हार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 420 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पात सन 2006 ते 2010 दरम्यान आदिवासी लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांची एकामागे एक अनेक प्रकरणे उघडकीस येत असल्याने खळबळ उडाली असुन या घोटाळ्यांचा आकडा तब्बल 3 कोटींच्या आसपास पोहोचला आहे.
कन्यादान योजना, दुधाळ जनावरे वाटप योजना, घरकुल योजना, युवक स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, तरुणांना संगणक प्रशिक्षण योजना, इंग्लिश स्पिकिंग तसेच महिलांना शिवणयंत्र व घरघंटी वाटप योजना, आदी विविध योजनांमध्ये हे घोटाळे झाले असुन दुधाळ जनावरे वाटप योजनेत सर्वाधिक 2 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकार्यांनी याबाबत जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. या तक्रारींनुसार, सन 2008-2009 साली आदिवासी लाभार्थ्यांकरीता राबविण्यात आलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत सर्वाधिक म्हणजेच 1 कोटी 48 लाख 80 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. तर सन 2006-2007 मध्ये याच योजनेतून 64 लाख 63 हजार असा एकुण 2 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच याच कालावधीत आदिवासी तरुणींकरीता राबविण्यात आलेल्या कन्यादान योजनेत 57 लाख 50 हजार रुपयांचा व युवकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेत 2 लाख 25 हजारांचा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सन 2008 ते 2010 दरम्यान घरकुल योजनेत 4 लाख 40 हजार, विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण योजना 2 लाख 60 हजार, शिवणयंत्र वाटप योजनेत 1 लाख 22 हजार, सन 2004 साली राबविण्यात आलेल्या इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण योजनेत 7 लाख 47 हजार 300 रुपये व घरघंटी पुरवठा योजनेत 1 लाख 33 हजार 606 रुपये असा एकुण 2 कोटी 90 लाख 20 हजार 606 रुपयांचा घोटाळा झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.