“सुपा फार्म रोटरी उत्कृष्टता पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न!

दहावीत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव!

0
2759
विद्यार्थ्यांना पुरस्कार देताना डॉ. मोहनभाई पटेल. सोबत प्राचार्य डॉ. राजपूत

डहाणू, दि. 15 : गेल्या सहा वर्षांपासून रोटरी क्लब मुंबई, पश्चिम व सुपा फार्म (अंबोली) यांच्याकडून डहाणू व तलासरी तालुक्यातील माध्यमिक शाळेत इयत्ता 10 मध्ये प्रथम, द्वीतिय व तृतिय क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार तसेच सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असुन सदर रक्कम डॉ. मोहनभाई पटेल यांच्या ठेवीमधून दिली जाते. यंदा जवळपास 78 शाळांना प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 7 लाख 80 हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात आली.

डहाणूचे आमदार विनोद निकोले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम दोन भागांमध्ये घेण्यात आला. पहिल्या भागात कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या डॉ. मोहनभाई पटेल सभागृहात हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार विनोद निकोले, विशेष अतिथी म्हणून माजी खासदार कॉ. लहानु कोम तर अध्यक्षस्थानी डॉ. मोहनभाई पटेल हे उपस्थीत होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार निकोले म्हणाले की, हा पुरस्कार आदिवासी भागातील तळागाळातील मुलांना दिला जातो ही फार महत्वाची बाब आहे, कारण या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तर मिळतेच त्याचबरोबर पुढे जाण्यासाठी हा सन्मान त्यांना प्रोत्साहन देतो. आमदारांनी डॉ. मोहनभाई पटेल व रोटरी क्लबच्या या उपक्रमास स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून त्यांना धन्यवाद दिले.

विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी

डॉ. मोहनभाई पटेल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी चांगल्या लोकांच्या संसर्गामुळे आपले जीवन कसे बदलून जाते हे सांगण्यासाठी, मोरोपंताची केकावली गाऊन चांगला संसर्ग कसा होतो हे आर्वजून सांगितले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कॉ. ल. शि. कोम यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन अधिकारी पदावर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरीयन अपूर्व गांगर यांनी डॉ. मोहनभाई पटेल यांचा परिचय करुन देताना त्यांच्या शैक्षणिक व सामामाजिक कार्याची व बहुआयामी व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले.

संस्थेचे अध्यक्ष ल. शि. कोम

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी आमदार निकोले व कॉ. लहानू कोम यांच्या कार्याची ओळख करुन दिली. कॉ. ल. शि. कोम आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कसे झाले, तो प्रसंग सांगून या संस्थेचा विकास कसा झाला याचा अहवाल मांडला. राजपूत यांनी विद्यार्थ्यांना या मान्यवरांकडून उत्तरदायीत्वाची भावना आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे हे सांगण्यासाठी विंदा करंदीकरांची देणार्‍याने देत जावे ही कविता सांगितली. याप्रसंगी रोटरी कल्बचे अध्यक्ष मनोज पटेल, रोटेरीन धर्मेंद्र शर्मा, सिध्दार्थ, सौ. निशा सागर, कॉ. बी. व्ही. मांगात, अजितदादा नार्वेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराचे वाचन प्रा. रितेश हटकर यांनी केले तर सूत्र संचालन प्रा. वाकडे यांनी केले.

दुसर्‍या भागात हा कार्यक्रम दुपारी 3 ते 5 या वेळेत डहाणूतील एच. एम. पी. हायस्कूल येथे पार पडला. डहाणू तालुक्यातील 30 शाळांमधील विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विक्रमगड विभानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल भुसारा, विशेष अतिथी म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वरुण पारेख उपस्थित होते. येथे देखील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन प्रोजेक्ट डायरेक्टर अपूर्व गांगर यांनी केले. दरम्यान, गेल्या सहा वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्याचे कार्यक्रम समन्वयक म्हणून प्राचार्य डॉ. राजपूत व गोदावरी परुळेकर महाविद्यालय हे काम पाहत आहेत.