वार्ताहर/बोईसर, दि. 5 : येथील चित्रालय येथे नियोजित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला बीएआरसीच्या आधिकार्यांनी सदर जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत विरोध दर्शविला होता व दोनदा काम पंद पाडले होते. मात्र आज बोईसर पोलिसांच्या संरक्षणात तसेच शासकिय अधिकारी व काही पक्ष, संघटनांच्या उपस्थित अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने जोर धरला होता. तसेच ग्रामीण रुग्णालयाची गरज लक्षात घेता चित्रालय येथील बीएआरसीच्या निवासी वसाहतीच्या संरक्षण भिंतीच्या लगत असलेल्या सर्वे नंबर 108 अ/ 30 या अडीच एकर जागेवर ग्रामीण रुग्णालय उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. दोन वर्षापुर्वी विविध पक्षांनी येथे भूमिपूजन देखील केले होते. मात्र ही जागा वन खात्याची असल्याकारणाने विविध परवानग्या व आरोग्य विभागाच्या नावे जमिन हस्तांतरणाच्या प्रक्रियेमुळे रुग्णालयाच्या बांधकामाला उशीर झाला. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाचे बांधकाम सुरू करताच ही जागा बीएआरसीच्या निवासी वसाहतीच्या संरक्षण भिंतीच्या लगत असल्याने ही जागा आमची असुन जागेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत येथील अधिकार्यांनी बांधकाम करण्यास मज्जाव केला होता.
मात्र न्यायालयाचे तसे कोणतेही आदेश नसताना व जमिन वनखात्याचीच असल्याचे उघड झाल्यानंतरही बीएआरसीच्या अधिकार्यांकडून येथे बांधकाम करण्यात अडथळा आणला जात असल्याने अखेर आज पोलीस संरक्षणात व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले.
यावेळी जिल्हा चिकित्सक डॉ. कांचन वानरे यांच्यासह शिवशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका प्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, जिल्हा परिषद सदस्या रंजना संखे, पंचायत समिती सदस्या विणा देशमुख यांच्यासह बोईसरमधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!