डहाणू दि. 18 फेब्रुवारी: कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनाच्या विरोधात आज पोलीसांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. डहाणूरोड रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे रुप आले होते. रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा उभा करण्यात आला होता. दंगल नियंत्रक पथक देखील सज्ज ठेवण्यात आले होते. आशागड येथील पोलीस दूरक्षेत्रासमोर देखील वाहन तपासणी सुरु करण्यात आली. प्रत्येक वाहनावर नजर मारुन मोठ्या संख्येने आंदोलक रेल्वे स्थानकावर जमा होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली होती. तरीही मर्यादीत संख्येने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोर्चा काढून रेल्वे स्थानकावर धडक दिली. पोलीसांनी आंदोलकांबरोबर समझोता करुन मोजक्या लोकांना प्रतिकात्मक रेल रोको करण्याची अनुमती दिल्यानंतर आंदोलन संपविण्यात आले.

