महामार्गावर पुन्हा 15 लाखांचा गुटखा पकडला

0
2476

तलासरी, दि. 12 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी हद्दीतील दापचरी चेकपोस्टवर पोलिसांनी पुन्हा एकदा 15 लाखांचा गुटखा पकडला आहे. एका टेम्पोमधुन हा गुटखा मुंबईच्या दिशेने नेला जात होता. याप्रकरणी टेम्पोच्या मालकासह एकुण 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दोन आठवड्यांपुर्वीच (27 डिसेंबर) याच चेकपोस्टवर पोलिसांनी दोन आयशर टेम्पोंमधुन 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दापचरी चेकपोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एम.एच. 03/सी.पी. 3341 या क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या टेम्पोला पोलिसांनी अडवले. यावेळी गाडीची पाहणी केल्यानंतर त्यात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखुचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. पकडलेल्या गुटख्याची बाजार भावानुसार किंमत 15 लाख 37 हजार रुपये असुन पोलिसांनी गुटखा व टेम्पो जप्त करत चालक अहमद अब्बुल हंनान (वय 37, रा.वापी, गुजरात) याच्यासह विक्रीसाठी हा गुटखा मागवणारे राजु, ईब्राहीम शेख व निपुल अशा एकुण 4 जणांवर तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.