768 रुग्ण पुर्णपणे बरे, तर 313 जणांवर उपचार सुरु; 19 मृत्यू
बोईसर : पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज, 27 जुलै रोजी 85 नवे कोरोना (कोविड-19) रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 57 रुग्ण केवळ पालघर तालुक्यातील आहेत. त्यामुळे एकट्या पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 वर पोहोचली आहे. समाधानाची बाब म्हणजे या 1100 रुग्णांपैकी 768 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असुन उर्वरित 313 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 19 रुग्ण कोरोना विषाणूला बळी पडले आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघरमध्ये सर्वाधिक 57, त्याखालोखाल डहाणूत 17, विक्रमगडमध्ये 5, वसई ग्रामीणमध्ये 4 व वाडा तालुक्यातील 2 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तलासरी, जव्हार व मोखाडा तालुक्यात आज एकही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.
पालघर तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या 1100 वर
पालघर ग्रामीणमधील इतर तालुक्यांच्या तुलनेत पालघर तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील एका आठवड्याची आकडेवारी पाहिल्यास काल, 26 जुलै रोजी 38 रुग्ण, 25 जुलै रोजी 33, 24 जुलै रोजी 54, 23 जुलै रोजी 50, 22 जुलै रोजी 33 अशा संख्येने येथील रुग्णांची संख्या वाढताना दिसली आहे.
बोईसरच ठरतोय मोठा हॉटस्पॉट :
पालघर तालुक्यात आज आढळलेल्या 57 रुग्णांपैकी तब्बल 23 रुग्ण केवळ बोईसर भागातच आढळून आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन बोईसर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतोय. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असुन मोठ्या प्रमाणावर नागरीक अफवांना बळी पडताना दिसत आहेत.
भीमनगरमधील सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले!
15 जुलै रोजी बोईसरमधील भीमनगर भागात 27 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हे 27 रुग्ण परिसरातील अनेकांच्या संपर्कात आल्याने येथील 104 जणांना वाडा व पालघर येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. या 104 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील आणखी 27 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. परिसरात एकुण 54 रुग्ण निष्पन्न झाल्याने व त्यात विविध अफवा पसरल्याने परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असून व त्यामुळेच लोकांना मुद्दाम पॉझिटिव्ह दाखवले जात असल्याच्या अफवेमुळे घाबरलेली काही कुटुंबे रातोरात गावी गेल्याचेही प्रकार उघडकीस आले होते. आता या भागातील सर्व रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले असून येथील नागरीकांनी काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे.